बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आपला ‘दबंग ३’ हा आगामी चित्रपट घेऊन लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. परंतु हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कारण या चित्रपटातील ‘हुड हुड दबंग’ या गाण्यातील दृश्यांवर काही मंडळींनी आक्षेप घेतला आहे. या गाण्यातून हिंदू देवतांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप आहे.

‘हुड हुड दबंग’ या गाण्यात हिंदू साधू तसेच भगवान शिव, प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण या हिंदू देवतांचा पोषाख परिधान करुन काही मंडळी सलमानसोबत नृत्य सादर करताना दिसत आहेत. या दृश्यांवर हिंदू जनजागृती समितीने आक्षेप नोंदवला होता. गाणं रिलीज झाल्यानंतर आता नेटकऱ्यांनी देखील सोशल मीडियाद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर ‘दबंग ३’ चित्रपटाविरोधात ‘#BoycottDabangg3’ हा हॅशटॅग व्हायरल होत आहे. यावेळी काही जणांनी सलमानला पाठिंबा देखील दिला आहे. या मंडळींनी ‘#BoycottDabangg3’ विरोधात ‘#AwaitingDabangg3’ हा हॅशटॅग व्हायरल केला आहे. परिणामी दबंग ३ मुळे नेटकरी दोन भागांत विभागले गेल्याचे दिसत आहे.

काय म्हणाले नेटकरी?

‘दबंग ३’ हा दबंग मालिकेतला अनुक्रमे तीसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या दोनही चित्रपटांनी बॉक्सऑफीसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. तसेच या चित्रपटांमध्ये सोनाक्षी सिन्हा हीने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. ‘दबंग ३’ मध्ये सोनाक्षीच मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या शिवाय मराठी सुपरस्टार महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर ही देखील या चित्रपटामध्ये अभिनय करताना दिसेल.

‘दबंग’ चित्रपट मालिकेत सलमानने चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट फ्लॅशबॅक फॉरमॅटमध्ये तयार केला गेला आहे. यांत पोलिस अधिकारी होण्याच्या आधी चुलबुल कसा होता? हे कथानक दाखवले जाणार आहे. सलमानचा चाहता वर्ग पाहता याआधी प्रदर्शित झालेल्या ‘ट्यूबलाईट’, ‘रेस -३’ व ‘भारत’ या तीनही चित्रपटांनी तिकीट बारीवर काही खास कमाल केली नव्हती. या पार्श्वभूमीवर ‘दबंग -३’ काय कमाल करतो हे नक्कीच पाहण्याजोगे ठरेल असे म्हटले जात आहे.