आठवडय़ाची मुलाखत  : सुमीत भारद्वाज (काश्मीरमधील गायक स्पर्धक )

रिअ‍ॅलिटी शोजच्या व्यासपीठावर देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक तरुण येत असतात. परीक्षकांसमोर उभे राहून आपली कला सादर करताना त्यांच्या मनातला तणावांचा गुंता असतो. मात्र जम्मू-काश्मीरमधील ‘पूंछ’ या सीमेलगतच्या गावातून आलेल्या सुमीतच्या मनात परीक्षकांसमोर गातानाही सादरीकरणापेक्षा आपल्या आईवडिलांच्या सुरक्षिततेचा विचार घोंघावत असतो. सध्या सुरू असलेल्या एका ‘रिअ‍ॅलिटी टीव्ही शो’मध्ये सहभागी झालेल्या सुमितशी केलेली बातचीत..

* ‘पूंछ’पासून मुंबईपर्यंतचा प्रवास कसा होता?

गेली पाच-सहा वर्ष मी मुंबईत येऊन रिअ‍ॅलिटी शोजमध्ये भाग मिळवण्यासाठी धडपड करतो आहे. पण अनेकदा शोजसाठी ऑडिशन्स देऊनही माझ्या पदरात नकारच पडला. तरीही रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी होता येणे हे माझ्यासाठी किती महत्वाचे आहे हे शब्दांत सांगणे अवघड आहे. पूंछमधून मी कधीच बाहेर पडलो नव्हतो. लहानपणापासून शाळा, अभ्यास, नातेवाईक, फिरणे सगळ्या गोष्टी पूंछमध्येच अनुभवल्या होत्या. मी किंवा माझे आईवडील गेल्या कित्येक वर्षांत पूंछच्या बाहेरच गेलेलो नव्हतो. पण तिथल्या परिस्थितीत फार पुढे जाणे शक्य नाही हे मला पुरेपूर समजले आणि माझ्या गायनाला इथे न्याय मिळावा, यासाठी मी मुंबईत आलो. पूंछ ते मुंबई हा एक स्वप्नांचा प्रवास होता आणि आजही आहे. आता या ‘टीव्ही शो’च्या माध्यमातून माझी माझ्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

*आईवडिलांच्या सुरक्षिततेची चिंता वाटते’ असे तू ‘शो’मध्ये जाहीरपणे म्हणाला होतास..

माझे गाव हे जम्मूपासून २३३ किमी दूर पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे. दरदिवशी दोन देशांमधील राजकीय तणावाच्या बातम्या नव्याने धडकत राहतात. सीमेवरची परिस्थिती तर कायम बिघडलेली असते. सततचा गोळीबार आणि दहशतीची छाया पूंछवर आहे आणि त्या परिस्थितीत माझे आईबाबा तिथे एकटेच आहेत. कधी वातावरण अचानक बिघडले आणि कुठे गोळीबार सुरू होईल काही सांगता येत नाही. या वातावरणात त्यांच्या जीवाची चिंता सतावतच असते.

* मुंबईकडे जास्त ओढा का?

पूंछपेक्षा इथलं वातावरण कितीतरी पटीने सुरक्षित आहे. पण तेवढे एकच कारण नाही. मी आधी सांगितले तसे की आम्ही कधीच पूंछमधून बाहेर पडलो नव्हतो. त्यामुळे आमचे किंवा माझ्या गावातील लोकांचे विचारही तितकेच संकुचित आहेत. त्यांना आपले गाव, आपली संस्कृतीच खूप मोठी आहे, महत्वाची आहे, असे वाटत राहते. आणि मग आहे तेच चांगले असे म्हणत अनेक तरूण नोकरीधंदा न करता टवाळगिरी करत बसतात. नकारात्मक विचारांचे बीज त्यामुळे रोवले जाते. त्यांनी या संकुचित वातावरणातून, विचारांतून बाहेर पडणे गरजेचे आहे. मी जर आज या शोमध्ये यश मिळवू शकलो तर त्यांनाही छातीठोकपणे सांगू शकेन. मुंबईतल्या लोकांची विचारसरणी वेगळी आहे. त्यांचा दृष्टीकोन खूप मोठा आहे. इथे येणारया प्रत्येकाला मेहनत करावीच लागते. मात्र कितीही अडचणी आल्या तरी आपण सतत प्रयत्न करत पुढे जाण्याची उर्जा इथे आहे. इथे चांगले काम करणाऱ्याला समजून घेणारी, त्याला पुढे जाण्यासाठी मदत करणारी माणसे आहेत. सुरक्षित आणि सुसंस्कृत वातावरण असल्याने माझ्या गावची लोकं इथे आली तर त्यांना आयुष्यात काहीतरी ठोस करता येईल, असा विश्वास मला वाटतो.

* पूंछमधून कायमचे बाहेरच पडायची इच्छा आहे?

खरेतर तसे नाही. पूंछचा निसर्ग इतका सुंदर आहे की तिथून बाहेर पडावेसेच वाटणार नाही. जम्मू-काश्मीरच्या सर्वात वरच्या, शेवटच्या टोकाला माझे गाव आहे. तिथल्या निसर्गाची तुलना अन्य कुठल्याही ठिकाणाशी करता येणार नाही. माझ्या खूप आठवणी आहेत तिथल्या.. आम्हाला पूंछमधून बाहेर पडायचे नाही. कित्येकदा पाकिस्तानच्या सीमेलगत असल्याने दहशतवादाच्या भीतीने तिथे कोणीच फिरकत नाही. खूप वाईट वाटतं की आपल्याच देशात असून आपल्या गावाबद्दल, माणसांबद्दल इतरांना द्वेष का वाटतो, भीती का वाटते. लोकांनी जम्मू-काश्मीरबद्दलचे गरसमज काढून टाकून तिथे आले पाहिजे, असे खूप वाटते. इथे चांगले काम करून तिथे परत जायचे आहे जेणेकरून आमच्या गावातल्या लोकांना स्वतंत्रपणे काही करण्याची, कुठल्यातरी क्षेत्रात नाव कमावण्याची प्रेरणा मिळेल. पूंछचे नाव देशभरात दुमदुमावे हीच माझी इच्छा आहे.

* रिअ‍ॅलिटी शो त्यासाठी महत्वाचे माध्यम ठरेल?

आज देशात अनेक खेडोपाड्यात जिथे शिक्षणाच्या सुविधा नाहीत, नोकरी-व्यवसायाच्या संधी नाहीत. अशा ठिकाणीही टीव्ही सगळीकडे पोहोचला आहे. मला स्वत:ला टीव्हीच्या माध्यमातूनच रिअ‍ॅलिटी शोजबद्दल कळले, त्यासाठी मुंबईत येण्याचा प्रयत्नही त्याच आधाराने झाला. या शोच्या माध्यमातून स्वत:ला जगासमोर सिध्द करण्याची संधी मला मिळाली.