27 October 2020

News Flash

मुलाखत : स्वत:वरील विनोद हा सर्वश्रेष्ठ विनोद..!

‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमातील समीर चौघुले यांच्या नाटिका सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमातील समीर चौघुले यांच्या नाटिका सर्वाधिक लोकप्रिय आहेत. विनोदाची जाण, हजरजबाबीपणा, शब्दभांडार असं सगळंच त्यांच्या अभिनय आणि लेखनातून झळकत असतं. त्यांच्या आजवरच्या प्रवासाबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत.

सिनेसृष्टीतला तुमचा प्रवास कसा घडत गेला?

– अभिनय क्षेत्रात यायचं असं काहीच ठरवलं नव्हतं. शाळेत असताना तर मी खेळांमध्ये जास्त पुढे असायचो. खो-खो, कबड्डी हे माझे नेहमीचे खेळ. खऱ्या अर्थाने अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात झाली ती कॉलेजमधूनच. मी डहाणूकर कॉलेजचा विद्यार्थी. कॉलेजमध्ये विविध कार्यक्रम होत असतात. एकदा माझा एक मित्र मला नाटकाच्या तालमीला घेऊन गेला. तिथे मला विश्वास सोहनी सर भेटले. या माझ्या गुरूंमुळेच नाटकाची, अभिनयाची गोडी लागली. तेव्हापासून एकांकिका करू लागलो. १९९१-९२ साली टीव्ही हे माध्यम आजच्यासारखं प्रभावी नव्हतं. त्यामुळे आमच्यासाठी या क्षेत्रात मोठी संधी म्हणजे व्यावसायिक नाटकांमध्ये काम करणं हेच असायचं. त्यामुळे सतत एकांकिका, प्रायोगिक नाटकं, स्पर्धा असं करत राहिलो. संतोष पवार लिखित-दिग्दर्शित ‘सुयोग्य असा मी अशी मी’ या व्यावसायिक नाटकात मी काम केलं. व्यावसायिक नाटकात काम करण्याचा पहिलाच अनुभव सुखावून गेला. त्याचे जवळपास ८०-९० प्रयोग केले. यानंतर माझ्या आयुष्यातलं मोठं नाटक म्हणजे ‘यदाकदाचित’. याचे तिनेक हजार प्रयोग केले. या नाटकाचाही उत्तम अनुभव मला मिळाला. मधली काही र्वष नोकरी-घर-संसार याकडे जास्त लक्ष दिलं. पुन्हा या क्षेत्राकडे वळल्यानंतर मालिका, नाटकं अशी जोमाने सुरुवात झाली. ‘टिकल ते पोलिटिकल’ या कार्यक्रमात मी लेखन-अभिनय केला. या कार्यक्रमाने आत्मविश्वास दिला. यानंतर विविध नाटकं, मालिका अशी एकेक कामं मिळत गेली. कलर्स मराठीच्या ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या तीनशे भागांमध्ये लेखक-अभिनेता म्हणून काम केलं. त्यानंतर ‘आंबट गोड’, ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं. सध्या कलर्स मराठीवर ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. ‘१७६० सासूबाई’, ‘पुढचं पाऊल’ या मालिकांसाठी लेखन केलं. ‘दिवसा तू रात्री मी’, ‘वाऱ्यावरची वरात’, ‘सेलिब्रिटी वस्त्रहरण’, ‘सेलिब्रिटी व्यक्ती वल्ली’, ‘बालक पालक’, ‘श्री बाई समर्थ’ अशा नाटकांमध्ये काम केलं. याशिवाय निक, पोगो अशा चॅनल्सवर लहान मुलांच्या कार्टून मालिकांसाठी हिंदी संवादलेखन केलं. भरत दाभोळकरांच्या ‘तमाशा मुंबई स्टाइल’, ‘कॅरी ऑन हेवन’, ‘बेस्ट ऑफ बॉटम्स अप’, ‘मंकी बिझनेस’ या हिंग्लिश नाटकांमध्ये मी सहा-सात र्वष काम केलं. अशा वीस-बावीस वर्षांच्या या प्रवासाने मला भरभरून सुख दिलं.

मधली काही र्वष नोकरी-घर-संसाराकडे लक्ष दिलं असं म्हणालात. मग नोकरी सोडण्याचा विचार का केलात?

– मधली काही र्वष मी ‘किलरेस्कर ब्रदर्स’मध्ये कमर्शिअल ऑफिसर म्हणून सात वर्ष नोकरी करत होतो. नोकरी करून आर्थिकदृष्टय़ा स्थिर होण्याला त्यावेळी मी प्राधान्य दिलं. अभिनयावर विशेषत: रंगभूमीवर माझं प्रचंड प्रेम आहे. हे प्रेम मला स्वस्थ बसू देईना. शिवाय कालांतराने नऊ ते साडेपाच अशी नोकरी करण्यात मला फारशी मजा येत नव्हती. आर्थिक स्थैर्य आल्याची खात्री पटल्यानंतर नोकरी सोडून मी पुन्हा अभिनय क्षेत्राकडे पूर्ण वेळासाठी यायचं ठरवलं. नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात येण्याचं खरंतर आव्हानच होतं. पण, त्यावेळी घरच्यांचा पाठिंबा मिळाला म्हणून मी हे करू शकलो.

अभिनयाबरोबरच तुमचं लेखनाचंही काम चांगलं सुरू होतं. पूर्ण वेळ लेखनासाठी द्यावा असं कधीच वाटलं नाही का?

– मुळात मी अभिनेता आहे. लेखनाकडे मी अपघाताने वळलो. लेखनाची मला आवड आहे. एका वाक्यावरून विषय फुलवायचा कसा हे कॉलेजमध्ये शिकलो होतो. या शिक्षणाचा मालिकांसाठी लेखन करताना फार उपयोग झाला. ‘टिकल ते पोलिटिकल’ या कार्यक्रमात एखादा प्रसंग वाढवायचा असेल, फुलवायचा असेल तर ते काम माझ्याकडे असायचं. मी लेखन करू शकेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. या कार्यक्रमात लेखन करण्यासाठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी मला प्रोत्साहन दिलं. अभिनयाची कामं येत गेली. त्यामुळे पूर्ण वेळ लेखनाचा विचार कधी केला नाही. लिखाणाची समज असल्यामुळे एक अभिनेता म्हणून मी घडत गेलो. वाचन वाढलं. भूमिका करत असलेल्या मालिकेतल्या सगळ्याच गोष्टी कलाकाराला पटतीलच असं नाही. पण, त्याचं ते काम असल्यामुळे ते करणं त्याची जबाबदारी असते. प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं होईलच असं नाही. लेखनात मात्र काय लिहायचं, काय नाही हे मी ठरवू शकतो. अशा कामामुळे मला समाधान मिळतं. लेखनामुळे माझ्यातल्या अभिनेत्याची उत्तम जडणघडण झाली हे खरंय. पण, पूर्णवेळ लेखन करण्याचा विचार कधी मनात आला नाही.

लेखनाचा इतका अनुभव गाठीशी असताना सिनेमा किंवा नाटक अजून का लिहिलं नाही?

– चित्रपटाचं लेखन करण्यासाठी मला विचारलं होतं. पण, सिनेमाची कथा मला फारशी आवडली नव्हती त्यामुळे त्यासाठी नकार दिला होता. मी जो सिनेमा लिहीन तो आधी मला आवडायला हवा. त्याची कथा मला पटली, रुचली पाहिजे. निरुत्साहाने, नावडलेल्या कथेच्या सिनेमासाठी केलेलं लेखन मला समाधान आणि आनंद देणार नाही. मला पटकथा, संवाद लिहायला नक्कीच आवडतील. नाटक लिहिण्याचीही इच्छा आहे. पण, नाटय़लेखन अतिशय काळजीपूर्वक करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे त्यासाठी पुरेसा वेळ, सकस विषय असं सगळंच आवश्यक आहे. नाटकांचं लेखन तुम्हाला अनेक गोष्टी शिकवून जातं.

विनोदी लेखन करणं किती आव्हान आहे?

– विनोदी लेखन करणं अतिशय कठीण आहे. त्यात तोचतोचपणा येणार नाही हे सांभाळावं लागतं. सतत नवीन आणि क्रिएटिव्ह मुद्दे मांडावे लागतात. मराठी प्रेक्षक हुशार आणि चोखंदळ आहेत. आजूबाजूच्या घटनांबाबत संपूर्ण माहिती असावी लागते. प्रसंगांमधली विसंगती हेरावी लागते. विनोदी लेखन शिकवण्याची कोणतीही संस्था नाही. विनोदी लेखनाची जाण तुमच्यात मुळातच असावी लागते. प्रसंग फुलवण्याची क्षमता असणंही तितकंच महत्त्वाचं असतं. हे सगळं मी लेखन करत असताना शिकत गेलो. सर्व बाजूंनी विचार करून, समतोल साधत, सतर्क राहून विनोदी लेखन करणं खरंच आव्हान असतं.

वेगवेगळ्या इव्हेंट्सचं लेखन हा लेखकांसाठी आता एक पर्याय आहे; असं वाटतं का?

– निश्चितच! इव्हेंट्सचं लेखन हा एक पर्याय आहे. लेखकांसाठी ही चांगलीच गोष्ट आहे. मी स्वत: सह्य़ाद्री वाहिनीच्या काही इव्हेंट्सचं लेखन करतो. सध्या कार्यक्रमांचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे अशा कार्यक्रमांच्या लेखनासाठी लेखकांना विचारलं जातं. मालिकेचं विनोदी लेखन आणि इव्हेंट्सचं विनोदी लेखन यात फरक असतो. तेही तितकंच आव्हानात्मक आहे. माझ्या मते इव्हेंट्सचं स्वरूप थोडं बदललं पाहिजे. त्यात पर्सनल कमेंट्स खूप होत असतात. त्याला मर्यादा हवी.

पर्सनल कमेंट्सचा मुद्दा मांडलात. विनोदी स्किट म्हणा किंवा कार्यक्रम; कलाकारांच्या बारीक-जाड असण्यावर, काळ्या रंगावरही विनोद होतात. तुमच्यावरही होत असतात. हे कितपत पटतं?

– यात गैर काहीच नाही. ज्या व्यक्तीवर विनोद करताय ती व्यक्ती खिलाडूवृत्तीने ते घेऊ शकेल असा विनोद करावा. ज्याच्यावर विनोद होतोय त्याला ते मान्य हवं. अर्थात याला मर्यादाही असायला हवीच. ती ओलांडली की त्या विनोदाचं रूपांतर अपमानात होतं. मराठीत हिंदीच्या तुलनेत हे प्रमाण बरंच कमी आहे. माझ्या टक्कल असण्यावर मी स्वत: विनोद करतो. पु.ल.देशपांडे, चार्ली चॅपलीन, दादा कोंडके अशा अनेक मोठय़ा व्यक्तींनी स्वत:वर विनोद केले आहेत. स्वत:वर केलेला विनोद हा सर्वश्रेष्ठ विनोद असतो असं मी मानतो. पण, तो दुसऱ्यावर करताना मर्यादेचं भान हवं हेही तितकंच महत्त्वाचं!

सतत विनोदी भूमिका साकारल्याने तशाच भूमिकांसाठी विचारलं जातं. यामुळे कलाकाराचं नुकसान होत नाही?

– नुकसानाबाबत प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात. माझ्या मते नुकसान होण्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला हवं. सतत विनोदी भूमिका केल्याने तशाच प्रकारच्या भूमिका विचारल्या जातात, हे मला मान्य आहे. मालिकेत एखाद्या कलाकाराने साकारलेली विनोदी व्यक्तिरेखा आवडली की त्या कलाकाराला तशाच भूमिका मिळणं अगदी स्वाभाविक आहे. मला यात चुकीचं काही वाटत नाही. पण, विनोदी भूमिका करण्यात मी स्वत:च जास्त कम्फर्टेबल असतो. कलाकार म्हणून मलाही काहीतरी वेगळं करावंसं वाटतं. मग अशा वेळी मी आविष्कारचं एखादं नाटक करतो. एक्सपरिमेंटल थिएटरकडे वळतो. म्हणूनच मी ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ या मालिकेतही नेहमीपेक्षा एक वेगळी भूमिका केली. नेहमीच्या कामांपेक्षा वेगळं असं हे काम आनंद देऊन जातं. सतत विनोदी भूमिका करून साचलेपण येऊ नये म्हणून मी विविध कामांमध्ये स्वत:ला गुंतवतो. मुळात साचलेपण येण्यासाठी अजून फार काम केलंच नाही असं मी म्हणेन. अजून खूप काम करायचंय, खूप शिकायचंय!

उत्तम अभिनय करणाऱ्या काही कलाकारांना या क्षेत्रात ओळख मिळवायला बराच वेळ लागतो. तुमच्याबाबतीतही असंच झालं असं म्हणायचं का?

– खरंय हे..! १९९२-९३ मध्ये नाटक-एकांकिकेत काम करू लागलो तेव्हा टीव्ही हे माध्यम आजच्यासारखं प्रभावशाली नव्हतं. माझं मध्यमवर्गीय कुटुंब असल्यामुळे शिक्षण, नोकरी, घर अशा मूलभूत गरजांच्या अपेक्षा होत्या. म्हणून मी नोकरी करू लागलो. नोकरी करत असताना मी फक्त एकाच नाटकात काम करत होतो. मी नोकरी करण्याच्या काळातच काही कलाकार या क्षेत्रात चांगलं काम करत होते. लोकप्रिय होत होते. कालांतराने खासगी वाहिन्या सुरू झाल्या. कलाकारांचे चेहरे प्रेक्षक ओळखू लागले. आर्थिकदृष्टय़ा स्थिर झाल्यानंतर मी नोकरी सोडली. मग मालिका, कथाबाह्य़ कार्यक्रम करू लागलो. ‘टिकल ते पोलिटिकल’ या कार्यक्रमामुळे ओळख मिळायला सुरुवात झाली. हळूहळू टीव्ही हे माध्यम अधिकाधिक प्रभावशाली होऊ लागलं. मलाही लोक ओळखू लागल्यामुळे टीव्हीची ताकद मला जाणवत होती. आजवर नाटकांचे इतके प्रयोग केले पण, ओळख मिळाली ती मालिकांमुळे; असं वाटायचं. ज्या काळात माझ्याबरोबरीचे काही मित्र कलाकार या क्षेत्रात करिअर करण्यासाठी संघर्ष करत होते त्यावेळी मी नोकरी करत होतो. त्यांनी या क्षेत्रात आधी संघर्ष केला आणि मग आर्थिक स्थैर्य मिळवलं. मी आधी स्थिर झालो आणि मग या क्षेत्रात येऊन संघर्ष सुरू केला. थोडक्यात काय तर, माझा प्रवास उलट दिशेने झाला. पण, नोकरी सोडून सिनेसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेणंही आव्हानच होतं. पण, माझं काम बघून मला कामं मिळत गेली. उशिरा आलो असलो तरी नंतर माझं काम प्रेक्षकांना आवडलं, इंडस्ट्रीतही कामाचं कौतुक झालं, लोकप्रियताही मिळाली.

ओळख उशिरा मिळाल्याची खंत वाटत नाही?

– अजिबात खंत वाटत नाही. तेव्हा घेतलेले निर्णय त्या त्या वेळासाठी योग्य होते. त्यावेळी मी जो निर्णय घेतला त्याची संपूर्ण जबाबदारीही मी घेतली. त्यावर मी ठाम होतो. जर-तरच्या गोष्टी आयुष्यात तुम्हाला त्रास देतात. ‘त्यावेळी मी अमुक केलं असतं तर तमुक झालं असतं’ असं वाटत राहतं. असं वाटून घेण्यापेक्षा वेळोवेळी घेत असलेल्या निर्णयावर ठाम राहणं, त्याची जबाबदारी घेणं याकडे लक्ष द्यायला हवं.

नाटक, मालिकांपेक्षा सिनेमातून कमी दिसलात. याचं काही विशेष कारण?

– माझं रंगभूमीवर प्रचंड प्रेम आहे. एकदा तुम्ही एखादं नाटक स्वीकारलंत की वेळेअभावी इतर प्रोजेक्ट्स करता येत नाहीत. किंबहुना मी ते घेत नाही. कारण एक नाटक जगवायचं असेल तर त्याच्या प्रयोगांसाठी तारखा देणं अत्यंत गरजेचं असतं. महिन्यातून चारच प्रयोग केले तर ते नाटकासाठी आर्थिकदृष्टय़ा फायद्याचं नाही. सिनेमा आणि नाटकातून कलाकाराला मिळणारं मानधन, त्याचं होणारं नुकसान-फायदा या सगळ्याचा मी विचार करत नाही. कारण नाटकावर माझं प्रचंड प्रेम आहे. मी नेहमी नाटकालाच प्राधान्य देतो. निर्माता एखाद्या नाटकात पैसे गुंतवत असेल तर नाटकाच्या प्रयोगाच्या तारखा पाळणे ही कलाकाराची जबाबदारी असते. सिनेमाचं शूटिंग जर सलग एकवीस दिवस असेल तर त्या दिवसांमध्ये नाटकाचे प्रयोग थांबवावे हे मला पटत नाही. टीव्ही हे माध्यम खूप प्रभावी आहे. टीव्हीमुळे अनेकांना आर्थिक स्थैर्य मिळालं आहे. सिनेमांमुळे कलाकारांना त्यांची कला मोठय़ा पडद्यावर सादर करायला मिळते. प्रत्येक माध्यम त्या त्या स्थानी श्रेष्ठच आहे. पण माझा नाटकाकडे कल जास्त आहे.

ठरावीक वेळी घेतलेले निर्णय त्या त्या वेळासाठी योग्य होते. तेव्हा घेतलेल्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारीही मी घेतली. जर-तरच्या गोष्टी आयुष्यात तुम्हाला त्रास देतात. ‘त्यावेळी मी अमुक केलं असतं तर तमुक झालं असतं’ असं वाटून घेण्यापेक्षा वेळोवेळी घेत असलेल्या निर्णयावर ठाम राहणं महत्त्वाचं असतं.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com, twitter – @chaijoshi11

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2016 1:24 am

Web Title: interview prasad chougule of comedychi bullet train
टॅग Mulakhat,Tv Serials
Next Stories
1 अ‍ॅनिमेटेड सोंड
2 फ्लॅशबॅक : जुम्मा चुम्मा दे दे …
3 सनी लिओनी लवकरच दिसणार बॉलीवूडच्या ‘संस्कारी’ बाबूजींसोबत
Just Now!
X