News Flash

विनाकारण कोणत्याही चित्रपटाला हो म्हणत नाही..

मराठी चित्रपटाच्या खूम मोठय़ा प्रमाणावर ऑफर येत असतात.

मुक्ता बर्वे

मराठी चित्रपटाच्या खूम मोठय़ा प्रमाणावर ऑफर येत असतात, पण विषय चांगला असेल, महत्त्वाचे म्हणजे पटकथा चांगली असेल तरच त्या चित्रपटाला ‘हो’ म्हणावे, अन्यथा काही काळ मला चित्रपटापासून लांब राहणे जमते, त्या काळात नाटक वगैरे गोष्टी सुरूच असतात, मुक्ता बर्वे भरभरून बोलत होती.
‘मुंबई-पुणे-मुंबई २ लग्नाला यायचं’ या चित्रपटाला घवघवीत यश लाभले. या पाश्र्वभूमीवर मुक्ताशी संवाद साधला तेव्हा ती हे सांगत होती.
ती पुढे म्हणाली, आता ‘गणवेश’ हा माझा चित्रपट प्रदर्शित होईल. त्यामध्ये मी किशोर कदम व स्मिता तांबे यांच्यासोबत आहे. २०१५ मध्ये मी ‘हायवे’, ‘डबल सीट’ व ‘मुंबई पुणे.. अशा तीन’ भिन्न स्वरूपाच्या चित्रपटातून रसिकांसमोर आले. तीनही चित्रपटांत अर्थातच माझ्या भूमिका भिन्न होत्या व त्यांचा मी भरपूर आनंदही घेतला. मधल्या काळात मी जाणीवपूर्वकपणे चित्रपटापासून दूर होते, त्यानंतर ‘डबल सीट’ची उत्तम पटकथा माझ्यासमोर आली व मी पुन्हा चित्रपटात कार्यरत झाले. अधूनमधून नवीन चित्रपटासंदर्भात विचारणा होते, पण माझ्या मनाला काही गोष्टी पटत नसतील तर मी ‘नाही’ म्हणते. उगाचच चित्रपटांची संख्या वाढवत ठेवण्यात मला रस नाही.
मुंबई-पुणेच्या पहिल्या भागापेक्षा दुसऱ्याबाबत तुला बऱ्याच प्रतिक्रिया मिळत असतील ना?
हो, अगदी बरोबर आहे. पहिला भाग चटपटीत मनोरंजन होता. दुसऱ्या भागात आजच्या युवा पिढीच्या लग्नासंदर्भातील गोंधळलेल्या मन:स्थितीचे दर्शन घडते. विशेषत: आजच्या काही युवती लग्न करायचे की नाही अथवा कधी करायचे अशा काही गोष्टीबाबत वेळीच निर्णय घेऊ शकत नाहीत. त्या साऱ्याचा परिपाक या चित्रपटात आहे. मनोरंजनासह भावनात्मक या चित्रपटात असल्याने रसिक या चित्रपटाशी उत्तमरीत्या जोडले गेले.
या चित्रपटाबाबतची सर्वोत्तम प्रतिक्रिया कोणती?
पुण्यातील एका मैत्रिणीच्या आजीने हा चित्रपट पाहून मला भरभरून मिठीच मारली व त्या म्हणाल्या, या चित्रपटाने मला बऱ्याच गोष्टींची उत्तरे सापडली. माझ्या नातीच्या मनात तिच्या लग्नाच्या निर्णयाबाबत नेमका काय गोंधळ चालला आहे, ते नेमके या चित्रपटात सापडले. इतरही बऱ्याच छान छान प्रतिक्रिया मला मिळत आहेत, ते ऐकून खरेच खूप खूप बरे वाटते. आपण निवडलेला चित्रपट, त्यासाठी घेतलेली मेहनत हे सगळेच योग्य ठरले असे वाटते, मुक्ता बर्वे गप्पा संपवत म्हणाली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2015 1:28 am

Web Title: interview with mukta barve
Next Stories
1 ‘कौल मनाचा’
2 अमेरिकेतील मानाच्या ‘इंडी फेस्ट’ फेस्टिवलमध्ये ‘सिंड्रेला’ला पुरस्कार
3 नात्याच्या अनुबंधाची कहाणी रेखाटणारा परतु
Just Now!
X