मुंबईतील १९९३ सालच्या बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने शुक्रवारी अबू सालेम आणि मुस्तफा डोसा यांच्यासह सात जणांना दोषी ठरवले. दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आणि गुन्हेगारी कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. अबू सालेमवर ‘टी सीरिज’ म्युझिक कंपनीचे मालक गुलशन कुमार यांच्या हत्येची सुपारी दिल्याचाही आरोप आहे.

वाचा : परेश रावलसह सर्व भारतीय गोमूत्र पिणारे, पाकिस्तानी समर्थकाची टिवटिव

१२ ऑगस्ट १९९७ रोजी अंधेरी पश्चिम येथील जितेश्वर महादेव मंदिराबाहेर तीन हल्लेखोरांनी गुलशन कुमार यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करीत त्यांची हत्या केली होती. गुलशन कुमार यांच्या हत्येचा कट कुख्यात गुंड अनीस इब्राहिम याच्या दुबईतील कार्यालयात शिजला होता. त्यावेळी अबू सालेमने गुलशन कुमार यांच्याकडून दर महिन्याला पाच लाख रुपये देण्याची मागणी केली होती. मात्र, गुलशन यांनी त्यास साफ नकार देत या पैशातून मी वैष्णोदेवीच्या मंदिरात भंडारा घालेन असे म्हटले होते. त्यामुळे चिडलेल्या सालेमने शूटर राजाला गुलशन यांची दिवसाढवळ्या हत्या करण्याचे आदेश दिले होते. काही संकेतस्थळांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलशन यांची हत्या करत असताना शूटर राजाने १०-१५ मिनिटे त्याचा फोन चालू ठेवला होता. गुलशन कुमार यांच्या शेवटच्या क्षणातील किंकाळ्या सालेम या फोनच्या माध्यमातून ऐकत होता.

वाचा : युद्ध करण्यापेक्षा समोरा समोर बसून बोला, सलमानचा भारत- पाकला सल्ला

गुलशन कुमार यांची हत्या व्यावसायिक वादातून करण्यात आल्याचेही म्हटले जाते. या हत्याप्रकरणात नदीम-श्रवण या प्रसिद्ध संगीतकार जोडीतील नदीम सैफ यांचाही हात असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. दरम्यान, गुलशन यांच्या हत्येनंतर बॉलिवूडमध्ये सालेमच्या नावाची दहशत निर्माण झाली होती. बॉलिवूडमध्ये सालेम ‘कॅप्टन’ नावाने प्रसिद्ध झाला होता. बॉलिवूडकरांना फोन करून तो पैसे उकळायचा. त्यामुळे पोलिसांनी त्याचे फोन टॅप करून त्याल अटक करू नये यासाठी त्याने स्वतःचे नाव कॅप्टन असे ठेवले होते.