इंडियन प्रीमिअर लीग- ११ साठी शनिवारी खेळाडुंवर बोली लावण्यात आली. या बोलीत प्रिती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने युवराज सिंगला पंजाब टीमसाठी विकत घेतले. गेल्या सीझनमध्ये युवराज सनरायझर्स हैदराबादकडून खेळला होता. पण यावर्षी मात्र युवराज त्याच्या जुन्या संघासोबतच खेळणार आहे. सय्यद मुश्ताक अली टी- २० मालिकेतही युवराजला साजेशी कामगिरी करता आली नाही. यामुळेच यावर्षी युवराजला त्याच्या मुळ किंमतीपेक्षा एकही रुपया जास्त मिळाला नाही. सुरूवातीला त्याच्यावर कोणी बोली लावणार नाही असेच वाटत होते. मात्र प्रितीने तिच्या टीमसाठी त्याला खरेदी केले. युवराज पंजाब टीमशिवाय आतापर्यंत दिल्ली डेअरडेव्हिल्स, रॉयल चॅलैंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या टीममधून खेळला होता.

युवराज आयपीएलचे पहिले काही सीझन किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला होता. पण त्यानंतर तो सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलैंजर्स बंगळुरू टीमसोबत जोडला गेला. सनरायझर्स टीमने युवराजसाठी राइट टू मैचचा फायदा न घेणेच योग्य समजले. यामुळे किंग्ज इलेव्हन २ कोटींमध्ये युवराजला विकत घेतले. युवराजला आपल्या टीममध्ये परत आणल्याचा सर्वाधिक आनंद प्रितीलाच झाला. तिने ट्विट करत म्हटले की, ‘युवराज परत घरी आलाय… आणि मी याहून आनंदी होऊच शकत नाही.’ तिच्या या ट्विटवर नेटकरांनी युवराजला कर्णधार करण्याचाच सल्ला तिला दिला.

तर दुसरीकडे वीरेंद्र सेहवागलाही खेळाडुंच्या बोलीवर टीपण्णी करण्याचा मोह आवरला नाही. सेहवागने दोन ट्विट करत या सर्व प्रक्रियेची थट्टाच उडवली. पहिल्या ट्विटमध्ये त्याने म्हटले की, ‘लहानपणी भाजी घ्यायला जायतो तेव्हा आई बोलायची की, योग्य त्या किंमतीत आण.. आणि आज आम्ही माणूस खरेदी करतोय तर मालक बोलतात की योग्य त्या किंमतीत विकत घ्या.’ दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबची मालकीण प्रिती झिंटाचीही खिल्ली उडवली. तो म्हणाला की, ‘मुलींना खरेजीची फार हौस असते. सध्या प्रिती खरेदीच्या मूडमध्ये आहे. तिला प्रत्येक गोष्ट खरेदी करायची आहे.’