अभिनेत्री प्रिती झिंटाने विनयभंगाच्या केलेल्या  तक्रारीप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी गुरुवारी आयपीएलचे अध्यक्ष सुंदर रमण यांच्यासह सहा जणांचा जबाब नोंदविला.
प्रिती झिंटाने नेस वाडिया (४४) याच्यावर  ३० मे रोजी वानखेडे स्टेडियममध्ये शिविगाळ करून विनयभंग केल्याची तक्रार दिली होती. संघाच्या कर्मचाऱ्यासमोर, बसण्याच्या जागेवर तसेच सामना संपल्यानंतर मैदानात अशा एकूण तीन ठिकाणी हा प्रकार घडल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते. या दिवशी सर्वाधिक म्हणजे ३७ हजार प्रेक्षक मैदानात होते. हा वाद झाल्यानंतर प्रितीने मला या घटनेबद्दल सांगितले होते अशी माहिती रमण यांनी पोलिसांना दिली आहे. जबाब घेतलेल्यांपैकी अनेकांनी या वादाला पुष्टी दिल्याचेही पोलिसांनी सांगितले. प्रितीच्या जबाबात अनेक संदिग्ध प्रश्न असून त्यासाठी तिचा पुरवणी जबाब नोंदविला जाणार आहे.
..तो नेस वाडिया नव्हे
प्रिती झिंटा आणि नेस वाडिया यांच्यात झालेल्या वादानंतर वृत्तवाहिन्यांनी प्रितीसोबत एक इसम वर्तुळ करून दाखविला होता. हा इसम नेस वाडिया असल्याचा दावा वृत्तवाहिन्यांनी केला होता. परंतु हा इसम नेस वाडिया नसून बीसीसीआयचा पदाधिकारी अंकित बाल्दी असल्याचे पोलिसांनी सांगितले. खुद्द अंकितनेच पोलिसांना हे सांगितले. वानखेडे स्टेडियममधील सामन्याचे प्रक्षेपण करणाऱ्या सोनी टीव्हीचे १९ कॅमेरे आहेत. त्या सर्वाचे सीसीटीव्ही चित्रण पोलीस तपासत आहेत.

रवी पुजारीनेच वाडियांना धमकी दिल्याचे उघड
उद्योगपती नेस वाडियांना प्रिती झिंटा प्रकरणातून दूर राहण्याची धमकी देणारा फोन अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी यानेच केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वाडियांच्या स्वीय सहाय्यकाने पुजारीच्या आवाजाचे नमुने ओळखून दूरध्वनीवरील धमकी देणारा आवाज त्याचाच असल्याचे सांगितले आहे.याचा तपास सुरू असताना सोमवारी नेस वाडिया यांच्या कार्यालयात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या नावाने धमकीचे दूरध्वनी आणि एक एसएमएस आला होता. दूरध्वनी व्हिओआयपी (व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) या तंत्राने केला होता. इंटरनेटद्वारे केलेले असे कॉल्स कुठून आले ते समजत नाही. मात्र एसएमएस इराणमधील मोबाइलने आला होता. पोलिसांकडे रवी पुजारीच्या आवाजाचे नमुने होते. ते नमुने वाडियांच्या स्वीय सहाय्याकाने ऐकल्यावर खात्री दिली.