आलिया भट, रणबीर कपूर, अथिया शेट्टी, सारा अली खान ही स्टार मुलं चित्रपटातून आपले नशीब अजमावत असतानाच आमिर खानच्या कन्येला मात्र इंग्रजी रंगभूमी आकर्षित करते आहे. आमिर खानची मुलगी इरा खान ‘मीडिया’ या इंग्रजी नाटकाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करते आहे. ‘युरीपाईड्स मीडिया’ या नाटकाचे पोस्टर नुकतेच समाजमाध्यमावर प्रदर्शित करण्यात आले. डिसेंबर महिन्यात ‘मीडिया’ या नाटकाचे मुंबई आणि बंगलोर या शहरात प्रयोग होणार आहेत. त्या निमित्ताने इरा खान हिच्याशी केलेली बातचीत..

नुकतेच इरा खान हिने इंस्टाग्रामवर ‘मीडिया’ नाटकाचे पहिले पोस्टर प्रदर्शित केले. आमिर खानची मुलगी नाटक कशा पद्धतीने दिग्दर्शित करते आहे, याबद्दल समाजमाध्यमांवर उत्सुकताही आहे आणि त्यातून चर्चेलाही सुरुवात झाली आहे. नाटकाच्या पोस्टरमध्ये काळा झगा घातलेली एक स्त्री दिसते, जिच्या हातात सुरी आहे. या नाटकाच्या पोस्टरवरून रहस्यमय नाटक असावे, अशी अटकळ बांधली जाते आहे. ‘मीडिया’ ही युरीपाईडस या लेखकाने लिहिलेली ग्रीक पुराणकथेवर आधारित कथा आहे. ही कथा जगभरात लोकप्रिय असून परदेशात या कथेवर नाटकांचे सादरीकरण करण्यात आले आहे. या नाटकात जेसन हा राजकन्येबरोबर लग्न करण्यासाठी स्वत:ची पत्नी आणि मुलांचे अपहरण करतो. अथेन्समध्ये ही घटना घडते. नवऱ्याची योजना लक्षात आल्यानंतर सुडाने पेटलेली मीडिया राजकन्येला आणि स्वत:च्या मुलांना मारण्याचा निर्णय घेते. मीडिया मुलांचा आणि राजकन्येचा वध करते का हे पाहण्यासाठी नाटय़गृहात जावे लागेल. ‘मीडिया’ या नाटकाची कथा मला जास्त भावली असल्याने हे नाटक दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतल्याचे इराने सांगितले.

चित्रपटापेक्षाही नाटक  हे माझे पहिले प्रेम आहे, असं ती सांगते. इंग्रजी नाटकातील नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत आणि एखादा विषय सादर करण्याची कला या गोष्टींमुळे नाटक हे चित्रपटापेक्षा वेगळे माध्यम ठरते, असे सांगतानाच लहानपणापासून इंग्रजी ब्रॉडवे नाटकं पाहात आल्याने त्याचा प्रभाव होता. त्यातूनच पुढे अशाच प्रकारचे नाटक दिग्दर्शित करण्याचे ठरवल्याचे तिने सांगितले. रंगभूमीवर नाटक सादर करण्यासाठी एक प्रकारची ऊर्जा आणि प्रयोगशीलता असणे गरजेचे आहे. तासा-दीड तासाच्या कालावधीत दिग्दर्शनाद्वारे कथा मांडणे हे तिला जास्त आव्हानात्मक वाटते. ‘कॅमेऱ्याच्या मागे राहून मला काम करायला आवडतं. भविष्यात विनोदी, भयपट, रोमँटिक अशा विविध प्रकारचे विषय हाताळायचे आहेत,’ असे ती म्हणते. सध्या नाटकावर लक्ष केंद्रित केले असल्याने चित्रपटात काम करण्याचा विचारच करत नसल्याचे तिने स्पष्ट केले. सध्या ‘मीडिया’ या नाटकाच्या तयारीत, कलाकारांकडून तालमी करून घेण्यात तिचा जास्त वेळ जातो. पण, म्हणून चित्रपटात काम करणारच नाही, अशी काही तिची भूमिका नाही. उलट एखाद्या चित्रपटाची कथा आवडल्यास काम करण्याचा इरादाही तिने व्यक्त केला आहे.

प्रत्येक मुलगी आणि वडिलांचे नाते खासच असते. त्याप्रमाणेच आमिर आणि इराचे नातेही तितकेच घट्ट आहे. माझ्यासाठी माझे वडील हे सुपरहिरो आहेत, असं ती अभिमानाने सांगते. जेव्हा आई – वडिलांना नाटक दिग्दर्शित करणार असं तिने सांगितलं तेव्हा त्यांना खूप आनंद झाला, इतकंच नाही तर नाटक अथवा चित्रपटाचे दिग्दर्शन करताना कोणती काळजी घ्यायची याचे मार्गदर्शनही वडिलांनी केले, असे ती सांगते. कोणतेही क्षेत्र निवडले तरीही मनापासून आणि आनंदाने काम कर, असा सल्ला त्यांनी मला दिला हे सांगणारी इरा आमिरच्या अभिनयाबद्दल बोलताना अजिबात थकत नाही.  तिने वडिलांचे सर्व चित्रपट पाहिले आहेत. त्यातही तिला  ‘दंगल’, ‘पीके’, ‘लगान’ आणि ‘जो जिता वही सिकंदर’ हे चित्रपट जास्त आवडतात, असं ती म्हणते. माझे वडील उत्कृष्ट अभिनेते आहेत. चित्रपटांची निवड ते अत्यंत जाणीवपूर्वक करतात. पुढे वडिलांचे चित्रपट दिग्दर्शित करण्यास आवडेल, असेही तिने सांगितले.

आमिर खान लोकप्रिय अभिनेते असल्याने त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन नेहमीच प्रकाशझोतात असते. चित्रपट, कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसारमाध्यमातून त्यांच्याबद्दल सतत लिहून येते. प्रसारमाध्यमे काय बोलतात आणि लिहितात याच्याकडे आपण कानाडोळा करत असल्याचे तिने स्पष्ट केले. कधी वर्तमानपत्रातील त्यांच्याविषयीच्या बातम्या वाचून मला हसायला येते, पण त्या बातम्यांमुळे माझ्या आयुष्यात काही फरक पडत नाही. तिचं संपूर्ण कुटुंबच खरं तर हिंदी चित्रपटसृष्टीत आहेत, तिला मात्र बॉलीवूडचे खास आकर्षण नाही. प्रसिद्धी, झगमगाटापासून ती जरा चार हात लांबच असते, असं ती म्हणते.  स्टार मुला-मुलींना तुलनेने हिंदी चित्रपटसृष्टीत संधी लवकर मिळते, असा समज आहे. परंतु, अभिनेत्यांची मुले आणि इतर मुले यांना काम आणि योग्यतेप्रमाणे संधी मिळते, असे तिचे स्पष्ट मत आहे. या क्षेत्रात खान किंवा कपूर आडनावापेक्षा अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर चांगल्या संधी मिळतात. मी चित्रपटसृष्टीत नवीन आहे. मी चांगले काम केल्यास मला संधी मिळेल, असेही तिने सांगितले. इंग्रजी, हिंदी नाटकाबरोबरच या खान कन्येने भविष्यात एखादा चित्रपट दिग्दर्शित केल्यास नवल वाटायला नको.