‘मी टु’ या मोहिमुळे आता आणखी एका दिग्दर्शकावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप झाला आहे. ‘नमस्ते लंडन’, ‘नमस्ते इंग्लड’ यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक विपुल शहा यांच्याविरोधात इराणी अभिनेत्री इल्नाझ नवरोजी हिनं आरोप केला आहे. चित्रपटात काम देण्याच्या बाहाण्यानं विपुल यांनी वारंवार आपल्याला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तसेच माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केली. पण, मी मुळची इराणी असल्यानं त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली नाही असं म्हणत इल्नाझनं सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे.

‘नमस्ते इंग्लड’ चित्रपटात काम देईल असं सांगत त्यांनी मला वारंवार स्वत:च्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. पण प्रत्यक्षात करार करण्याची वेळ आली त्यावेळी मात्र बहाणा सांगत त्यांनी मला काम द्यायला नकार दिला. त्यांच्या ऑफिसमध्ये मी गेले असताना त्यांनी माझ्याशी गैरवर्तणुक केली मला बळजबरीनं किस करण्याचा प्रयत्न केला. त्यांना माझ्याकडून शरीरसुख हवे होते त्याबदल्यात मला चित्रपटात ते काम देणार होते पण, मी त्यांचा हेतू साध्य होवू दिला नाही. मी आशा सोडली दरम्यान त्याचवेळी मला सेर्केड गेम्समध्ये काम करण्याची संधी मिळाली.’

‘तीन महिने मला प्रचंड मानसिक त्रास झाला. मी प्रत्येकवेळी त्यांच्या ऑफिसमध्ये जायचे तेव्हा ते मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करायचे, माझ्याशी असभ्य वागायचे पण मी इराणी असल्यानं पोलिसात त्यांच्याविरुद्ध तक्रार केली नाही. माझ्या व्हिसामध्ये अडथळे येतील असं वाटल्यानं मी गप्प बसले, म्हणूनच मी आता सोशल मीडियाद्वारे आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत’, असं तिनं म्हटलं आहे. याआधी साजिद खान, विकास बेहल, रजत कपूर, सुभाष घई यांसारख्या दिग्दर्शकावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप झाले आहेत.