सध्या दोन हॉलीवूडपटांच्या चित्रीकरणादरम्यान इथे येऊन हिंदी चित्रपट करणारा अभिनेता इरफान खान या दोन्ही इंडस्ट्रीत मोठा फरक आहे, हे मान्य करतो. मात्र एका अभिनेत्यासाठी प्रेक्षकांना जो वेगळी अनुभूती देतो तो चित्रपट होय मग तो आंतरराष्ट्रीय चित्रपट असो किंवा हिंदी असो, प्रादेशिक असो त्याने फरक पडत नाही, असे इरफान म्हणतो. आपणही बॉलीवूडमध्ये स्थिरस्थावर होण्याच्या प्रयत्नात थेट हॉलीवूडला कसे पोहोचलो याबद्दल आजही आश्चर्य वाटत असल्याचे त्याने सांगितले.
यावर्षी हॉलीवूड अभिनेता टॉम हँक्सबरोबर ‘इन्फे र्नो’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर ‘साँग ऑफ स्कॉर्पिअन्स’ या चित्रपटात काम करीत असलेल्या इरफानचे एकाच वेळी अनेक गोष्टींवर काम सुरू आहे. बॉलीवूड विरुद्ध हॉलीवूड, असा फारसा विचार तो करीत नाही. दोन्हीकडेही चित्रपटाची कथा जास्त महत्त्वाची असते. हॉलीवूडमधील अभिनेते हे त्या कथेसाठी काम करतात. तर आपल्याकडे समोरच्या कलाकारानुसार कथा बेतली जाते. नेहमीच्या साच्यापेक्षा भिन्न काही तरी करणाऱ्याला हॉलीवूडमध्ये नेहमीच प्रोत्साहन मिळत आले आहे. इथे आपल्याकडे तसे होत नाही. मात्र बॉलीवूडमध्ये नाव कमावण्यासाठी धडपडत असताना मी हॉलीवूडमध्ये पोहोचेन, अशी कल्पनाबी केली नव्हती. पण आयुष्यात बऱ्याचदा असे अनपेक्षित धक्के तुम्हाला बसतात, असे इरफानने सांगितले. गेल्या वर्षी ‘पिकू’, ‘तलवार’, ‘ज्युरासिक पार्क’ आणि पहिल्यांदाच ऐश्वर्या राय बच्चनबरोबर काम करण्याची संधी मिळालेला ‘जझबा’ अशा चार चित्रपटांमधून इरफानने काम केले होते. संजय गुप्ता दिग्दर्शित ‘जझबा’ या त्याच्या चित्रपटाचा एचडी प्रीमियर ‘झी सिनेमा’वर होणार आहे. त्यानिमित्ताने बोलताना या चित्रपटातील आपली भूमिका अत्यंत वेगळी होती, असे इरफानने स्पष्ट केले.
ऐश्वर्यासारखी अभिनेत्री ही स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची, बाणेदार अशी आहे. त्यामुळे तिच्याबरोबर काम करताना अँजेलिना जोलीबरोबर काम करताना दडपण जसं येईल तशाच प्रकारची भीती असते. त्यामुळे साहजिकच अशा वेळी समोरच्या कलाकाराबरोबर मोकळेपणाने काम करण्यासाठी काय करता येईल, याचा आपण शोध घेतो. शिवाय, आपल्याला काय काम करायचे आहे, याचीही आपल्याला कल्पना असते. माझी आणि ऐश्वर्याची जोडी एकत्र आल्यानंतर प्रेक्षकांना आमच्यामध्ये काही तरी वेगळे रसायन जाणवले. कित्येकदा प्रेक्षक नायक-नायिकांच्या जोडीत काही वेगळे शोधण्याचा प्रयत्न करतात आणि ते स्वत:च क ल्पना लढवायला लागतात. कलाकार म्हणून हे सगळे अनुभवताना गंमत येते, असेही त्याने सांगितले. प्रत्येक व्यक्तीची यशाची व्याख्या वेगळी असते. आपल्या चित्रपटातून आपली प्रतिमा लोकांच्या मनावर ठसली तर तो खरा यशस्वी चित्रपट असे आपल्याला वाटत असल्याचे त्याने सांगितले. ‘टाइमपास’ पद्धतीचे चित्रपट मला आवडत नाहीत. मी कधीही करणार नाही, असेही त्याने स्पष्ट केले.