16 October 2019

News Flash

Iron Man : एक करिश्माई सुपरहिरो

... या एका घटनेवरुन ‘टोनी स्टार्क’ची वाढती लोकप्रियता आपल्या ध्यानात येते. परंतु इतर सुपरहिरोंच्या तुलनेने ‘आयर्नमॅन’ इतका लोकप्रिय का आहे?

‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ सुपरहिरोपटाचा ट्रेलर इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. यात दाखवल्या गेलेल्या प्रत्येक दृष्याचा अभ्यास करुन अगामी चित्रपटात काय घडेल या संदर्भात अनेक समिक्षकांनी भविष्यवाणी करण्यास देखिल सुरवात केली आहे. काहींनी मेलेले सुपरहिरो पुन्हा जिवंत कसे होणार? याबाबत आपली मते मांडली तर काहींनी खलनायक थेनॉसला हरवण्याचे विविध पर्याय सुचवले. परंतु या सर्व गोंधळात ‘आयर्नमॅन’ उर्फ ‘टोनी स्टार्क’ने चाहत्यांचे खरे लक्ष वेधुन घेतले. टायटन ग्रहावर थेनॉस विरुद्ध झालेल्या भिषण युद्धात टोनी जबर जखमी झाला. आणि सध्या तो अन्न पाण्यावाचून अंतराळात भटकत आहे. ट्रेलरमध्ये दाखवल्या गेलेल्या या दृष्याला पाहून चाहते इतके भावुन झाले की त्यांनी आयर्नमॅनला वाचवण्यासाठी थेट ‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’ उर्फ नासाशी संपर्क साधला. दरम्यान नासाकडे येणाऱ्या इमेलचा ओघ इतका प्रचंड होता की त्यांचा संदेश स्वीकारणारा सर्वरच निकामी झाला. या एका घटनेवरुन ‘टोनी स्टार्क’ची वाढती लोकप्रियता आपल्या ध्यानात येते. परंतु इतर सुपरहिरोंच्या तुलनेने ‘आयर्नमॅन’ इतका लोकप्रिय का आहे?

माव्‍‌र्हल युनिव्हर्समधील शेकडो सुपरहिरो आजवर आपण पाहिले आहेत. परंतु या सर्वांत ‘आयर्नमॅन’ हा एकमेव सुपरहिरो असा आहे ज्याच्या जन्मापासून त्याच्या आयर्नमॅन आर्मरमधील विज्ञानापर्यंत प्रत्येक गोष्टीचे संदर्भासहित स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे सुपरहिरो म्हटले की अफाट शक्ती व फक्त चांगलेच गुण दाखवण्याची एक परंपरा आहे. परंतु ‘टोनी स्टार्क’ या परंपरेत अपवाद ठरतो. कारण जीतका तो प्रेमळ आहे, तीतकाच गर्विष्ठ आहे. जीतकी कृतज्ञता त्यात आहे, तीतकाच तो कृतघ्न देखिल आहे. निर्मात्यांनी ‘टोनी स्टार्क’ ही व्यक्तीरेखा चित्रीत करताना त्याच्यातील राग, लोभ, मत्सर कुठल्याच गुणाला बगल दिलेली नाही. थोडक्यात काय तर आयर्नमॅन आर्मरमधील टोनी हा माणून म्हणुन कसा आहे? हे दाखवण्याचा पुर्ण प्रयत्न केला गेला आहे. तसेच त्याच्या शक्तींच्या बाबतीत म्हणायचे झाले तर “थॉर, ओडीन, कॅप्टन माव्‍‌र्हल, हेला” यांच्यासारखी कुठलीही दैवी शक्ती त्याच्याकडे नाही. “कॅप्टन अमेरिका, हल्क, वुल्वरीन, डेडपूल” यांप्रमाणे त्याच्या शरीरावर कुठल्याही प्रयोगशाळेत प्रयोग केले गेलेले नाहीत. शिवाय ‘एक्स मेन’ प्रमाणे कुठल्याही म्युटंट शक्ती त्याच्याकडे नाहीत. तो आपल्यासारखाच एक सामान्य पृथ्वीवासी आहे. पंरतु तरी देखिल इतर सुपरहिरोंच्या खांद्याला खांदा लावुन तो मिरवु शकतो. आणि बहुदा हीच गोष्ट आपल्याला इतर सुपरहिरोंच्या तुलनेने आयर्नमॅनकडे जास्त आकर्षित करते.

टोनी अपारंपरिक प्रवृत्तीचा आहे. इतर सुपरहिरोंप्रमाणे तो आपली ओळख लपवून ठेवत नाही. उलट विरोधकांच्या टिकेची पर्वा न करता बेधडक संपूर्ण जगासमोर आपणच आयर्नमॅन असल्याचे तो कबूल करतो. आपल्या भडक व झगमगीत जीवनशैलीचे तो जाहीर प्रदर्शन करतो. टोनी इतका कर्तुतवान आहे की नवीन पिढी त्याच्याकडे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पाहते. या पार्श्वभूमीवर विचार करता “स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स, मार्क झकरबर्ग” यांसारख्या इतर आदर्श व्यक्तींप्रमाणे त्यानेही समाजात वावरताना नम्रता दाखवणे अपेक्षित आहे. परंतु समाजाने ठरवुन दिलेल्या कुठल्याच नियमांची पर्वा तो करत नाही. ही बिनधास्त जीवनशैली कितीही आकर्षक वाटत असली तरी प्रत्येक वेळी त्याला फायदेशीर ठरतेच असे नाही. कित्येकदा त्याला या बेधुंद प्रवृत्तीमुळे मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. ‘अ‍ॅव्हेंजर्स: एज ऑफ अल्ट्रॉन’मध्ये आपण पाहिले की त्याच्या चुकांची किंमत संपुर्ण न्यूयॉर्क शहराला मोजावी लागते. हजारो लोकांचे हसते खेळते आयुष्य एका क्षणात उध्वस्त होते. परंतु ‘टोनी’ इतका हट्टी आहे त्यानंतरही त्याच्या प्रवृत्तीत तीळमात्र बदल झालेला नाही.

Speak one’s mind अशी एक इंग्रजी म्हण आहे. टोनीची विचारसरणी या म्हणीसारखीच आहे. मनातली कुठलीही गोष्ट तोंडावर आणण्यासाठी तो वेळ काढत नाही. आपले विचार मांडताना तो कोणाचीही पर्वा करत नाही. त्याच्या या हजरजबाबीपणामुळे बऱ्याचदा विनोद तर घडतोच. पण त्याचबरोबर अनेकदा संघर्षही पेटतो. याची उदाहरणे आपण अ‍ॅव्हेंजर्स चित्रपट मालिकेच्या चारही भागात पाहिली आहेत. टिकाकार त्याच्या या मुफट स्वभावाला त्याचा अहंकार, बेशिस्तपणा व असंस्कृतपणा मानतात. परंतु ‘टोनी’ असाच आहे. आणि चाहत्यांनी असेच त्याला स्विकारले आहे.

एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. त्याप्रमाणे आतापर्यंत आपण टोनीच्या फक्त एकाच बाजुचा विचार करत होतो आता आपण दुसऱ्या बाजुचा विचार करु. टोनीचे बाह्यरुप जीतके जहाल आहे. आतुन तो तीतकाच मवाळ आहे. माव्‍‌र्हल युनिव्हर्समध्ये हातांच्या बोटांवर मोजण्याइतके सुपरहिरो सोडले तर जवळपास कोणाकडेच अमरत्व नाही. तरीही मृत्यृच्या भितीने सर्वात जास्त थरकाप उडत असतो तो ‘टोनी स्टार्क’चाच. अगदी स्वप्नातही मृत्यृ त्याची पाठ सोडत नसल्याचे दृष्य आपण ‘अ‍ॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर’मध्ये पाहिले आहे. परंतु खरे पाहता टोनीची ही भितीच त्याचे सर्वात मोठे शस्त्र आहे. त्याच्या यशाचे खरे गमक त्याच्या भितीतच लपले आहे. तो जीतका घाबरतो तीतकाच जास्त मजबुत होण्याचा प्रयत्न करतो. ‘आयर्नमॅन’ चित्रपटमालिकेच्या पहिल्या भागात जेव्हा एक दहशदवादी संघटना टोनीचे अपहरण करते तेव्हा मृत्यृ टाळण्यासाठीच तो आपला पहिला ‘आयर्न आर्मर’ तयार करतो. पुढे आक्रमणे वाढत राहतात आणि टोनीची भितीही, परंतु त्याचबरोबर त्याचा आयर्नसुटही अद्ययावत होत जातो. अनेक अद्ययावत शस्त्रे त्यात वाढवली जातात. पाहता पाहता ‘आयर्न आर्मर मार्क -१’ पासून सुरु झालेला प्रवास आज ‘मार्क -५०’ पर्यंत पोहोचला आहे. आणि त्यामुळेच संपूर्ण आकाशगंगा नष्ट करण्याची क्षमता असलेल्या थेनॉसलाही टोनी डोळ्यात डोळे घालुन आव्हान देतो. यावरुनच भीती त्याचे किती मोठे शस्त्र आहे हे आपल्या ध्यानात येते.

यशस्वी होण्यासाठी मनात फक्त भीती असुन भागत नाही. त्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनतीची जोड लागते. ‘आयर्नमॅन’ चित्रपटमालिकेच्या तिसऱ्या भागात जेव्हा टोनीचा आयर्नसूट निकामी होतो तेव्हा एक लहान मुलगा त्याला प्रश्न विचारतो “आता तु काय करणार?” यावर क्षणाचाही विलंब न करता टोनी चटकन उत्तर देतो मी काही अज्ञात शक्ती प्राप्त केलेला कोणी सुपरहिरो नाही, मी विजेवर चालणारी उपकरणे तयार करणारा एक साधा माणूस आहे. त्यामुळे मी आता एक नवीन उपकरण तयार करणार. सर्वसाधारणपणे आजवर आपण पाहिलेल्या चित्रपटांत टोनी पैसे उधळताना दिसतो किंवा आयर्नमॅन अवतारात शत्रुशी दोन हात करताना दिसतो. प्रामुख्याने त्याची ही दोनच रुपे दाखवली जातात. परंतु अद्ययावत उपकरणे तयार करणारा ‘यांत्रिकी अभियंता’ हे त्याचे तिसरे रुप देखिल आहे. बऱ्याचदा पटकथेच्या लांबीचा विचार करुन त्याला फारसे महत्व दिले जात नाही. परंतु अब्जाधीश जरी असला तरी इतर उद्योजकांप्रमाणे तो आपले काम इतरांकडून करुन घेत नाही. तो स्वता:चे काम स्वता:च करण्यावर विश्वास ठेवतो. त्याला हवे असलेले यंत्र तयार करुन होईपर्यंत एखाद्या सैनिकाप्रमाणे तो दिवसरात्र झुंजत राहतो. आणि याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘अ‍ॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर’मध्ये दाखवण्यात आलेला त्याचा आयर्नसूट होय. याच सूटच्या जोरावर तो कित्येक तास थेनॉसशी लढतो. सर्वांनाच आश्चर्यचकित करणाऱ्या या सूटवर टोनीने केलेली मेहनत पाहताच दिसते. हेच रुप आहे, जे त्याला इतर सुपरहिरोंपेक्षा वेगळे करते. त्याला काळाच्या चार पावले पुढे पळवते, आणि त्याला ‘आयर्नमॅन’ बनवते.

‘टोनी स्टार्क’ हे “स्टॅन ली, लॅरी लिबर, डॉन हेक आणि जॅक कर्बी” या चौघांनी मिळून तयार केलेली एक काल्पनिक व्यक्तिरेखा आहे. परंतु टोनीच्या सवयी, स्वभाव व त्याची वागणुक अगदी आपल्यासारखीच आहे. आपल्या प्रत्येकात टोनीसारखेच एक बिनधास्त, उत्साही, बेशिस्त, लहान मूल असते. काळाच्या ओघात कधी सामाजिक तर कधी आर्थिक भितीपोटी आपण त्याला खोलवर दाबत जातो. परंतु जेव्हा कधी आपण ‘टोनी स्टार्क’ सारखी उचापती व्यक्तिरेखा पाहतो तेव्हा ते कशाचीही पर्वा न करता ते मूल अगदी उचंबळुन बाहेर येते. त्यामुळेच इतर सुपरहिरोंच्या तुलनेने आयर्नमॅन अधीक जवळचा वाटतो. इतका की ते एक काल्पनीक पात्र आहे, हे माहित असताना देखिल आपण त्याला वाचवण्यासाठी नासाकडे विनवण्या करु शकतो.

 

First Published on January 13, 2019 2:47 am

Web Title: iron man is the most charismatic marvel superhero by mandar gurav