News Flash

‘आयर्न मॅन’चा सूट चोरीस

‘माव्‍‌र्हल’ कंपनीला गेल्या काही वर्षांत सातत्याने मिळणाऱ्या यशामागे अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनिअरचा सिंहाचा वाटा आहे.

‘माव्‍‌र्हल’ कंपनीला गेल्या काही वर्षांत सातत्याने मिळणाऱ्या यशामागे अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनिअरचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे त्याने साकारलेला ‘टोनी स्टार्क’ ऊर्फ ‘आयर्न मॅन’ हा सुपरहिरो त्यांच्याकडे असलेला हुकमाचा एक्का असे म्हटले जात आहे. या सुपरहिरोची संपूर्ण ताकद त्याच्या ‘आयर्न सूट’मध्ये आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे आता तो सूटच चोरीला गेला आहे. ‘एमसीयू’ (माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स) वस्तुसंग्रहालयातून २५ एप्रिलच्या आसपास सूट चोरीला गेला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दहा वर्षांपूर्वी १ लाख अमेरिकी डॉलर खर्च करून स्टॅन विन्स्टन यांनी तयार केलेला हा सूट ‘आयर्न मॅन’ चित्रपटमालिकेच्या पहिल्या भागात वापरला गेला होता. दिग्दर्शक केनेथ ब्रेनग यांच्या मते आज बाजारात या सूटची किंमत तब्बल ३ लाख २५ हजार अमेरिकी डॉलर आहे. माव्‍‌र्हल सुपरहिरोंनी वापरलेले सर्व साहित्य एखाद्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाप्रमाणे त्यांच्या एका खास वस्तुसंग्रहालयात ठेवले जाते. हा आयर्न सूटही तेथेच संग्रहित करून ठेवला गेला होता. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे शेकडो सीसीटीव्हींची नजर चुकवून तो चोरीला गेला. चोरी लक्षात येताच सुरक्षा अधिकाऱ्यांनी लगेचच पोलीस तक्रार केली. तसेच पोलिसांनीही तक्रारीची गांभीर्याने नोंद घेत तातडीने आपले तपासकार्य सुरू केले. सीसीटीव्ही कॅमेरा, अद्ययावत सुरक्षा प्रणाली आणि शेकडो सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून सूट चोरी झालाच कसा?, हा प्रश्न पोलिसांना सतावतो आहे. तसेच ‘माव्‍‌र्हल’नेही या शोधकार्यासाठी काही गुप्तहेरांची नेमणूक केली असून आयर्न सूट शोधून देणाऱ्यास हजारो डॉलर्सचे इनाम जाहीर केले आहे.

‘माव्‍‌र्हल’साठी तो एक केवळ सुपरहिरो सूट नाही तर त्यांच्या वस्तुसंग्रहालयातील एक खास आकर्षणदेखील आहे. त्यामुळे लाखो चाहत्यांच्या भावना या सूटशी जोडल्या गेल्या आहेत. शिवाय २००७ साली जेव्हा ‘माव्‍‌र्हल’ कंपनी कर्जबाजारी झाली होती. त्या वेळी हा आयर्न मॅन सूटच होता ज्याने त्यांना पुन्हा एकदा यशाची इमारत रचण्यास मदत केली. त्यामुळे हा सुपरहिरो सूट म्हणजे त्यांच्या यशाची गुरुकिल्लीच आहे, असे म्हटले जाते. आणि म्हणूनच या सूटची किंमत त्यांच्यासाठी काही डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 2:18 am

Web Title: iron man suit has been stolen hollywood katta part 128
टॅग : Hollywood Katta
Next Stories
1 सर्वोच्च पदावर जाण्याची धडपड
2 मायानगरी..
3 प्रेमळ लोकांची नाजूक गोष्ट
Just Now!
X