गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेता इरफान खान न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर neuroendocrine tumour या दुर्धर आजाराशी झुंज देत आहे. त्याच्या प्रकृतीविषयी अनेकांनीच चिंता व्यक्त केली आणि तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. तर दुसरीकडे इरफानने स्वत: या आजारापुढे हात टेकले आहेत. आयुष्याकडून आपल्या अपेक्षांप्रमाणेच सर्व गोष्टी मिळतातच असं नाही, असं इरफानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या या मुलाखतीत इरफानने त्याच्या भावनांना, त्याला होणाऱ्या वेदनांना शब्दांद्वारे वाट मोकळी करून दिली.

इरफान खान- 

‘न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर हे नावच माझ्यासाठी नवीन होतं. या दुर्धर आजाराविषयी माहितीच कमी उपलब्ध असल्याने उपचाराबाबतही प्रश्नचिन्ह होते. उपचाराची चाचणी जणू काही माझ्यावरच केली जात होती. त्याची काहीच शाश्वती नव्हती. या खेळाचा मी एक भाग होतो. खूप अपेक्षा, स्वप्न, इच्छा, ध्येय घेऊन तुम्ही एखाद्या प्रवासाला निघता आणि इच्छित स्थळी पोहोचण्यापूर्वीच तुम्हाला गाडीतून उतरण्यास सांगितलं जावं, तसंच काहीसं माझ्यासोबत घडलंय. भय आणि अस्वस्थतेनं माझ्यावर जिंकू नये इतकीच माफक अपेक्षा माझी आहे.’

‘मला होणाऱ्या वेदना भयंकर आहेत. त्यावेळी फक्त आणि फक्त तीव्र वेदना जाणवतात. संपूर्ण विश्व त्या क्षणी एक होतं आणि फक्त एकच गोष्ट तीव्रतेने जाणवत असते, ती म्हणजे वेदना. ज्या रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरू आहेत त्याच्यासमोर लॉर्ड्स स्टेडियमची मागची बाजू दिसते. मला जाणवणाऱ्या वेदनांमध्ये विवियन रिचर्ड्सचा हसऱ्या चेहऱ्याचा पोस्टर मला दिसला. पण ते जग माझं राहिलंच नाही असं वाटू लागलं. जीवन- मरणाच्या या खेळामध्ये फक्त एकच मार्ग आहे. एका बाजूला रुग्णालय आणि दुसऱ्या बाजूला स्टेडियम. कुठेच कोणत्याही गोष्टीची शाश्वती नाही आणि हीच गोष्ट माझ्या मनाला खूप लागली. या जगात एकच गोष्ट निश्चित आहे ती म्हणते अनिश्चितता हेच मला त्यावेळी जाणवलं. माझी ताकद काय आहे, शक्ती काय आहे हे ओळखून हा खेळ अधिक चांगल्या प्रकारे खेळणं, इतकंच काय ते आता माझ्या हातात राहिलं आहे.’

‘अनिश्चिततेची जाणीव झाल्यामुळे मी आता परिणामांची चिंता न करता सर्व काही देवाच्या हाती सोपवून त्याच्यावर विश्वास ठेवून जगू लागलो आहे. यामुळे माझ्या मनातील चिंता, काळजी निघून गेली आहे. मला स्वातंत्र्य म्हणजे काय, मुक्तता म्हणजे काय हे तेव्हा खऱ्या अर्थाने समजलंय. आयुष्य पुन्हा एकदा नव्याने पाहतोय की काय असंच मला वाटू लागलं. माझ्यातला आत्मविश्वास वाढू लागलाय.’

‘या संपूर्ण प्रवासात, जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक माझ्यासाठी प्रार्थना करू लागले. त्यांच्या प्रार्थनांमुळे मला बळ मिळू लागलं. महासागरातील पाण्यांच्या लाटांवर हेलकावे घेणाऱ्या एखाद्या छोट्याशा किंवा सामान्य वस्तूमध्ये त्या लाटांना नियंत्रित करण्याची शक्ती नसते किंबहुना त्या लाटांना नियंत्रणात आणण्याचा अर्थहिन प्रयत्न त्याने करूच नये. फक्त निसर्गाच्या त्या शक्तीपुढे स्वत:ला त्याने झोकून द्यावं आणि त्याचा आनंद लुटावा.’