एका पाकिस्तानी टीव्ही शोदरम्यान दिवंगत अभिनेते इरफान खान व श्रीदेवी यांच्यावर विनोद केला गेला. याबद्दल पाकिस्तानी अभिनेते अदनान सिद्दिकी यांनी जाहीर माफी मागितली आहे. अदनान यांनी श्रीदेवी व इरफान या दोघांसोबत बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं होतं. म्हणून त्यांना या टीव्ही शोमध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्यादरम्यान झालेल्या विनोदामुळे त्यांनी शो वर टीका करत चाहत्यांची माफी मागितली.

अदनान यांनी ट्विटरवर याबद्दल लिहिलं, ‘मला सध्या काय वाटतंय हे शब्दांतही मांडता येत नाहीये. पण हे माझ्या मनातून बाहेर पडणं अत्यंत आवश्यक आहे. ‘जीवे पाकिस्तान’ या लाइव्ह चॅट शोमध्ये मला आमंत्रित करण्यात आलं होतं. इरफान खानच्या दु:खद निधनानंतर हा शो आयोजित केला होता. या चॅट शोचे सूत्रसंचालक आमिर लियाकत साहब यांनी अत्यंत संवेदनशील विषयावर विनोद केला. श्रीदेवी आणि इरफान हे दोघं माझे आवडते व्यक्तीमत्त्व होते म्हणून नव्हे तर इतर अनेक गोष्टींच्या बाबतीत हे खूप चुकीचं होतं. मी अशा विनोदाला कमरेखालचे विनोदसुद्धा बोलू शकत नाही.’

त्यांनी पुढे लिहिलं, ‘एखाद्याच्या मृत्यूनंतर अशा प्रकारे विनोद करणं लज्जास्पद आहे. यामुळे फक्त सूत्रसंचालक किंवा मी नाही तर संपूर्ण देशाला चुकीच्या पद्धतीने पाहिलं जाईल. मी श्रीदेवी साहिबा आणि इरफान खान साहब यांच्या कुटुंबीयांची माफी मागू इच्छितो. कार्यक्रमात जे काही झालं त्याने मी स्वत: हादरलो आहे. त्या शोमध्ये उपस्थित राहिल्याचा मला पश्चात्ताप होत आहे. यातून मी चांगला धडा शिकलोय आणि भविष्यात अशा घटना होणार नाहीत याची काळजी घेईन.’

अदनान यांनी ज्या ज्या कलाकारांसोबत काम केलं ते आज या जगात नाही, असं सूत्रसंचालक आमिर म्हणाला. इतकंच नव्हे तर अदनान यांनी राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी २’मधील भूमिका नाकारल्याने त्यातील कलाकारांचे प्राण वाचले, असंही तो म्हणाला.

अदनान यांनी ‘मॉम’ या चित्रपटात श्रीदेवीच्या पतीची भूमिका साकारली होती. श्रीदेवी यांचा हा अखेरचा चित्रपट होता. २००७ मध्ये त्यांनी ‘अ माइटी हार्ट’ या इंग्रजी चित्रपटात इरफानसोबत स्क्रीन शेअर केला होता.