आपल्या दर्जेदार अभिनयाच्या बळावर संपूर्ण चित्रपटसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता इरफान खान सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून एका गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या इरफानने नुकतीच एक वेब सीरिज सोडल्याचं समोर आलं आहे.

न्युरोएंडोक्राईन या कर्करोगाशी सामना करणाऱ्या इरफानवर लंडनमध्ये उपचार सुरु आहेत. त्यामुळे आतापर्यंत त्याच्यावर पाच केमो थेरपी करण्यात आल्या असून लवकरच सहावी थेरपीही करण्यात येणार आहे. या थेरपीचा परिणाम इरफानच्या शरीरावर होत आहे. त्यामुळे त्याने आगामी वेब सीरिजमधून काढता पाय घेतला आहे. ही माहिती खुद इरफानने सोशल मीडियावर दिली आहे.

अमेझॉन प्राईम अंतर्गत तयार होणाऱ्या या वेब सीरिजचं नाव ‘गोरमिंट’ असं असून एआयबीचे को फाऊंडर गुरसिमरन याची निर्मिती करत आहेत. विशेष म्हणजे या सीरिजमधील काही भागांच चित्रीकरण पूर्ण झालं आहे. मात्र प्रकृती अस्वास्थामुळे या सीरिजमध्ये पुढे काम करु शकणार नाही असं इरफानने सांगितलं.

‘या सीरिजमध्ये काम करताना मजा आली. मात्र आजारपणामुळे माझं शरीर मला साथ देत नाहीये. त्यामुळे या पुढे मी या सीरिजमध्ये काम करु शकत नाही’, असं इरफान म्हणाला.

दरम्यान, काही दिवसापूर्वीच इरफानचा ‘कारवां’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर अभिनेता सलमान खान आणि मिथिला पालकर यांनी स्क्रिन शेअर केली आहे.