बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुतापा सिंकदर सोशल मीडियावर बऱ्याचवेळा पोस्ट करताना दिसतात. नुकताच सुतापा यांनी केलेली पोस्ट चर्चेत आहे. ही पोस्ट त्यांनी इरफान यांच्या आठवणीमध्ये लिहिली असून सीबीडी ऑईलला भारतात लीगल करण्याची मागणी केली आहे.

सुतापा यांनी इरफान खान लंडनमध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते त्या हॉस्पिटलचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘लंडनच्या या हॉस्पिटलमध्ये इरफान उपचार घेत होता. आज त्याच हॉस्पिटलच्या खोलीकडे पुन्हा पाहिले तर इरफान तेथे असल्यासारखे वाटत आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. त्याच बरोबर हॅशटॅगचा वापर करत भारतात सीबीडी ऑईल लीगल करा असे म्हटले आहे.

सीबीडी ऑईल वापरल्यामुळे दुखणे कमी होते असे म्हटले जाते. तसेच कॅन्सरवर उपचार घेत असताना रुग्णाला प्रचंड त्रासातून जावे लागते. त्यामुळे कॅन्सरवर उपचार करताना सीबीडी ऑईलचा वापर केला जातो असे म्हटले जाते. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी चौकशी सुरु असताना ड्रग्ज प्रकरण समोर आले. त्यानंतर सीबीडी ऑइलच्या चर्चा सुरु झाल्या. हे ऑईल भारतात वापरण्यावर बंदी आहे.