21 February 2019

News Flash

Exclusive : नागराजच्या ‘नाळ’चा टीझर आहे या हॉलिवूडपटातील दृश्याची कॉपी?

'नाळ'चा टीझर आणि या हॉलिवूडपटाची सुरुवात यामध्ये बरंच काही साधर्म्य आहे.

'नाळ'

मराठीतील दमदार, आशयघन चित्रपटांसाठी दिग्दर्शक नागराज मंजुळे ओळखले जातात. ‘फँड्री’, ‘सैराट’ अशा एकाहून एक चित्रपटांचं दिग्दर्शन नागराज यांनी केलं. या चित्रपटानंतर आता ते निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. आगामी ‘नाळ’ या मराठी चित्रपटाची निर्मिती नागराज करत आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटाची घोषणा करतानाच त्यांनी टीझरसुद्धा शेअर केला. मात्र हा टीझर एका हॉलिवूडपटातील दृश्याची कॉपी असल्याचं समजलं जात आहे.

‘नाळ’ चित्रपटाच्या दीड मिनिटाच्या टीझरमध्ये रुईची बी उडताना दिसते. उडता उडता ही बी नदीत पोहत असलेल्या एका लहान मुलाच्या हाती लागते. अमेरिकन रोमॅण्टिक ड्रामा ‘फॉरेस्ट गम्प’च्या चित्रपटाची सुरुवातसुद्धा अशाच एका दृश्याने होते. हवेत उडणारं पीस एका व्यक्तीच्या पायाजवळ येऊन पडतं. ‘नाळ’चा टीझर आणि ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाची सुरुवात यामध्ये बरंच काही साधर्म्य आहे. त्यामुळे टीझरमधील दृश्य या हॉलिवूडपटातील दृश्याची कॉपी असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाची कथा नेमकी काय आहे हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

पाहा ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूडपटातील दृश्य-

‘सैराट’ चित्रपटाचे कॅमेरामन सुधाकर रेड्डी यांनी ‘नाळ’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘माझ्याच मनातली गोष्ट सुधाकर सांगतोय,’ असं नागराज यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं. हा चित्रपट येत्या १६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

First Published on October 12, 2018 10:03 am

Web Title: is nagraj manjule naal marathi movie is copy of american romantic drama forrest gump