बॉलिवूडमधील एखाद्या ‘स्टार’ अभिनेत्याने मराठी चित्रपटाचे कौतुक केले की मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून येतो. त्यातही ‘खान’दानी माणसाकडून अशी वाहव्वा झाली तर मग बघायलाच नको. मात्र, मराठीच्या वाटय़ाला हिंदीकडून कित्येकदा अशी स्तुतीसुमनेच फक्त पदरात पडली आहेत. कार्यक्रम संपला की मग या स्टार कलाकारांना आपण काय बोललो होतो हेही बहुधा लक्षात राहत नसावे. त्यामुळे कित्येकदा त्यांचे कौतुक हे ‘बोलाचा भात आणि बोलाचीच कढी’ ठरते. बॉलिवूडच्या ‘खान’दानातील सलमान खानच्या मराठी प्रेमाचेही सध्या तसेच झाले आहे.
मराठीत सध्या ‘यलो’ या एका वेगळ्या विषयावरील चित्रपटाची चर्चा सुरू आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा विकलांग असलेल्या गौरी गाडगीळ हिच्या जिद्दीचा प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे गौरीनेच या चित्रपटात काम केले आहे. ‘डाऊन सिंड्रोम’ असलेल्या गौरीने जलतरणात विशेष प्राविण्य मिळविले आहे. रितेश देशमुख, उत्तुंग ठाकूर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांनी केले आहे.
या चित्रपटाचा खास खेळ नुकताच सलमान खानसाठी आयोजित करण्यात आला होता. चित्रपट पाहून सलमान नेहमीप्रमाणे खूपच प्रभावित झाला आणि आपल्या ‘बीइंग ह्युमन’ या संस्थेतर्फे आपण हा चित्रपट हिंदीत करू, असे त्याने लगोलग जाहीरही केले. सलमान खानच्या या कौतुकाने पुन्हा एकदा मराठीजनांचा ऊर भरून आला असला तरी त्याने याआधीही आपण मराठी चित्रपट हिंदीत करणार असे सांगितले होते. मात्र, अजून त्याने सांगितलेल्या एकाही मराठी चित्रपटाला त्याने हात लावलेला नाही.
चार वषांपूर्वी मराठीत महेश मांजरेकर यांचे ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ आणि ‘शिक्षणाच्या आयचा घो’ हे दोन चित्रपट खूप गाजले होते.
मराठीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ चित्रपटाची चर्चाही मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत झाली होती. तर ‘शिक्षणाच्या आयचा घो’ या चित्रपटाचा विषय खुद्द सलमानलाच ‘लय भारी’ वाटला होता. त्यावेळीही त्याने कौतुकाच्या भरात आपण हा चित्रपट लवकरच हिंदीत करू, असे सांगितले होते. मात्र, अजूनतरी यापैकी कुठल्याच मराठी चित्रपटाचा हिंदी अवतार प्रेक्षकांना पहायला मिळालेला नाही. त्यामुळे आता ‘यलो’चे ही तसेच होते की सलमान खरोखरच या चित्रपटाचा हिंदी रिमेक करतो, त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.