News Flash

पुण्यातल्या गणेशोत्सवाची मजाच वेगळी – ईशा केसरकर

''मी फार श्रद्धाळू नसले, तरी गणपती जवळचा वाटतो. त्याची पूजा करण्यात आनंद मिळतो.''

isha_keskar
इशा केसकर

प्रतिनिधी

मी फार आस्तिक नाही, पण तरीही गणपती मला आवडतो. माझे वडील नास्तिक आणि आई आस्तिक! दोघेही नोकरी करणारे, त्यामुळे आम्ही घरी कधीही गणपती आणला गेला नाही. आमच्या घरातला देव्हारासुद्धा फक्त आईचाच होता. गावी-सोलापूरला गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जात असे, पण बाबा नास्तिक असल्यामुळे ते गणपतीत गावी जायला फारसे प्रोत्साहन देत नसत. त्यामुळे गावी गणेशोत्सव कसा साजरा केला जातो, याचा अनुभव मी कधी घेतला नाही.

सोसायटीतल्या, सार्वजनिक गणपती उत्सवातही मी फार कधी सहभाग घेतला नाही. फक्त एकदा पुण्यात सोसायटीतल्या गणेशोत्सवात ‘सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला’ या गाण्यावर नृत्य केलं होतं. आमच्या घरी गणपतीची एक जुनी दगडी मूर्ती आहे. गेली तीन वर्षे गणेश चतुर्थीला मी त्याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. आरास, नैवेद्य, आरत्यांचं स्तोम नव्हतं. फुलांचीच सजावट करत असे. अगदी जवळचे तीन-चार मित्र येत. घरातल्या बादलीतच मी मूर्ती विसर्जित करत असे.

माझी वहिनी गिरगावची आहे. त्यामुळे मुंबईत आल्यानंतर मी तिच्याबरोबर गिरगावातील विविध मंडळांचे गणपती पाहिले. पण पुण्यातल्या गणपतीशी असलेलं नातं वेगळंच आहे. पुण्यात असताना रात्री सार्वजनिक गणपती पाहायला हमखास जात असे. सगळे मित्र-मैत्रिणी रात्रभर धमाल करायचो. आताही मी पुण्यातले गणपती पाहायला जाते. पण आता लोक ओळखू लागले आहेत, त्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागते. स्कार्फ बांधून, कोणी मला ओळखणार नाही, याची काळजी घेऊनच आता मी गणपती बघायला जाईन.

पुण्यात लक्ष्मी रोडवर, अलका टॉकीजच्या चौकात गणपती विसर्जनाची मिरवणूक पाहणं हा एक अनोखा अनुभव असतो. तिथे संध्याकाळी मानाचे गणपती एकत्र येतात. सर्व मंडळांचे कार्यकर्ते रिंगण घालतात. एकेका मंडळाचे ३०० कार्यकर्ते असतात, मंडळांचे ढोल तालात वाजू लागतात तेव्हा निर्माण होणारं वातावरण अनुभवण्यासारखं असतं. माझ्या मैत्रिणीचं घर टिळक चौकात आहे. त्यामुळे कधी कधी आम्ही तिच्या सोसायटीच्या गच्चीतून मिरवणूक पाहतो. मी फार श्रद्धाळू नसले, तरी गणपती जवळचा वाटतो. त्याची पूजा करण्यात आनंद मिळतो.

सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2019 2:09 pm

Web Title: isha keskar talking about ganeshotsav in pune ssv 92
टॅग : Ganeshotsav
Next Stories
1 ‘ही’ आहेत गणेशोत्सवातील सर्वाधिक लोकप्रिय गाणी
2 गणरायाला आईस्क्रीमच्या मोदकांचा नैवेद्य
3 गणेशोत्सव मंडळांसाठी ‘मुंबईचा राजा’ स्पर्धा
Just Now!
X