07 March 2021

News Flash

बेधडक

बॉलीवूडमध्ये तुमचा प्रवेश कसा होईल, हे कोणीच सांगू शकत नाही. इशानचंही तसंच झालं

माजिद मजिदी दिग्दर्शित ‘बियाँड द क्लाऊड्स’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांसमोर येतो आहे.

बॉलीवूडच्या घराणेशाहीवर कितीही बोटं ठेवली तरी या घराण्यांमधून पिढी दरपिढी येणारा एक नवा चेहरा कुठल्या ना कुठल्या वेगळ्या परिस्थितीत रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवतो. त्याची सुरुवात सहजसोपी असेलही कदाचित, मात्र टिकून राहण्यासाठी त्याला त्याच्या अभिनय क्षमतेशिवाय काही उपयोगाचं नाही, हे बाळकडू पचवून इशान खत्तार बॉलीवूडमध्ये बे‘धडक’ प्रवेश करतो आहे. बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूरचा लहान भाऊ म्हणून इशानवर सगळ्यांच्या नजरा रोखलेल्या आहेत. इशानची आई नीलिमा अजीज याही एके काळी छोटय़ा आणि मोठय़ा पडद्यावरच्या अभिनेत्री आहेत. त्याचा बॉलीवूड प्रवेश खरं म्हणजे करण जोहरच्या ‘धडक’ चित्रपटाने व्हायचा होता, मात्र त्याची सुरुवात त्याच्या स्वभावाप्रमाणेच वेगळ्या चित्रपटापासून होते आहे. माजिद मजिदी दिग्दर्शित ‘बियाँड द क्लाऊड्स’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांसमोर येतो आहे.

बॉलीवूडच्या घराणेशाहीवर कितीही बोटं ठेवली तरी या घराण्यांमधून पिढी दरपिढी येणारा एक नवा चेहरा कुठल्या ना कुठल्या वेगळ्या परिस्थितीत रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवतो. त्याची सुरुवात सहजसोपी असेलही कदाचित, मात्र टिकून राहण्यासाठी त्याला त्याच्या अभिनय क्षमतेशिवाय काही उपयोगाचं नाही, हे बाळकडू पचवून इशान खत्तार बॉलीवूडमध्ये बे‘धडक’ प्रवेश करतो आहे. बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूरचा लहान भाऊ म्हणून इशानवर सगळ्यांच्या नजरा रोखलेल्या आहेत. इशानची आई नीलिमा अजीज याही एके काळी छोटय़ा आणि मोठय़ा पडद्यावरच्या अभिनेत्री आहेत. त्याचा बॉलीवूड प्रवेश खरं म्हणजे करण जोहरच्या ‘धडक’ चित्रपटाने व्हायचा होता, मात्र त्याची सुरुवात त्याच्या स्वभावाप्रमाणेच वेगळ्या चित्रपटापासून होते आहे. माजिद मजिदी दिग्दर्शित ‘बियाँड द क्लाऊड्स’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांसमोर येतो आहे.

बॉलीवूडमध्ये तुमचा प्रवेश कसा होईल, हे कोणीच सांगू शकत नाही. इशानचंही तसंच झालं. प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक माजिद मजिदी त्यांच्या चित्रपटांसाठी ऑडिशन्स घेतायेत हे कळल्यावर त्यालाही त्यासाठी विचारणा झाली. जिमवरून परतताना मी निर्मात्यांच्या कार्यालयात मजिदींना भेटण्यासाठी शिरलो. त्यांनी माझ्याकडे पाहून कसरत करतोस का, असं विचारलं. बाइक चालवशील का, याचीही चौकशी केली. तोवर त्यांना माझा भाऊ, आई, माझी फिल्मी पाश्र्वभूमी काहीच माहिती नव्हती; पण त्यांनी मला ऑडिशन शूट करून यायला सांगितलं. तसाच घरी जाऊन मी पुन्हा ऑडिशनसाठी शहरातल्या रस्त्यांवर होतो. त्यांनी ज्या पद्धतीने मूड शूट करायला सांगितलं होतं त्या पद्धतीने त्यांच्या साहाय्यकाने शूट केलं. ३८ मिनिटांच्या या फुटेजमधून आम्हाला ६ मिनिटांची क्लिप बनवायची होती, पण मजिदी यांनी न कंटाळता ते सगळंच फुटेज पाहिलं आणि ताबडतोब मी निवडलो गेलो आहे, याचा पैगामही आला.. अशा फिल्मी भाषेतच इशानने मजिदींच्या हिंदी चित्रपटाचा हिरो बनण्यामागची कथा सांगितली. त्यांचे सगळे चित्रपट त्याने खरं म्हणजे आधीच पाहिले होते, पण प्रत्यक्षात ते कसे आहेत हे मला त्या भेटीतच अनुभवायला मिळालं, असं तो सांगतो.

इशानच्या आयुष्यावर त्याच्या मोठय़ा भावाचा- शाहीदचा प्रभाव आहे. या दोन्ही भावांमधलं प्रेम कधीही लपून राहिलेलं नाही. कुठे ना कुठे तरी माझ्या नकळत्या वयात त्याच्या चित्रपटांसह त्याच्या सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी परिणामकारक ठरल्या होत्या, असं तो म्हणतो. ‘‘मला खूप जण हा प्रश्न विचारतात की, चित्रपटात यायचं हे आधीपासूनच ठरवलेलं होतं का? हो.. मला लहानपणापासून हेच करायचं होतं. मी आठ वर्षांचा होतो तेव्हा भाईने (शाहीद) कामाला सुरुवात केली होती. अल्बम्स, मॉडेलिंग आणि मग चित्रपट अशी त्याची वाटचाल सुरू झाली होती. त्याच्यामुळेच मला खरं तर लहान वयात या जगात डोकावण्याची संधी मिळाली आणि मी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. मी कुठेही त्याच्याबरोबर बेधडक सेटवर जायचो. कॅमेरामनच्या बाजूला उभं राहून सगळं बघत असायचो. त्यामुळे माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत चित्रपटाबद्दलचे सगळे घटक माझे अभ्यासून झाले होते. मी त्याचे सगळे चित्रपट बनताना आणि पूर्ण झाल्यावर पडद्यावरही पाहिले आहेत. मी १५-१६ वर्षांचा होईपर्यंत खूप जागतिक चित्रपटही पाहिले होते. एकीकडे माझी आई मला आवर्जून जुने हिंदी चित्रपट दाखवत होती. तिच्याबरोबर फेस्टिव्हलचे चित्रपटही पाहिले. मी इतके चित्रपट मिळवून मिळवून पाहिलेत की त्या व्हिडीओच्या दुकानात अजूनही माझं खातं आहे,’’ असं इशान गमतीने सांगतो.

शाहीदला कलाकार म्हणून घडताना पाहणं हाच त्याच्यासाठी एक प्रकोरे या क्षेत्राचा अभ्यास ठरला, असं तो नमूद करतो. ‘‘भाईच्या व्यक्तिमत्त्वाचा माझ्यावर खूप प्रभाव आहे, कारण मी कायम त्याच्याशीच बोलत आलो आहे, त्याचं जग पाहात मोठा झालो. कुठे तरी त्याच्याशी बोलणं, काही गोष्टी त्याच्याशी शेअर करणं आवश्यक होतं. तो माझा गुरू आहे एका अर्थाने आणि पाहायला गेलं तर तो स्वत:ला सिनेमाचा विद्यार्थी मानतो. त्यामुळे आमच्या दोघांचं हे नातं खूप वेगळं आहे. त्याचा स्वत:चा कलाकार म्हणून जो प्रवास होता तो मला खूप काही शिकवून गेला. फार कमी वयात मला या क्षेत्रातील खाचखळगे लक्षात आले,’’ असं त्याने सांगितलं. ‘‘मी मजिदींच्या चित्रपटासाठी ऑडिशन देतो आहे हे आईला माहिती होतं, पण त्याला माहिती नव्हतं. ‘धडक’ची सगळी तयारी झाली होती. त्यामुळे एकाच वेळी मी दोन तऱ्हांचे चित्रपट करतो आहे, तेही मजिदींचा चित्रपट आधी सुरू होणार आहे हे त्याला कळल्यावर साहजिकच त्याला माझी काळजी वाटायला लागली. तो खूप खूशही होता आणि दुसरीकडे इतक्या लहान वयात मला या दोन्ही चित्रपटांचं काम एकाच वेळी सांभाळता येईल का, याबद्दलही त्याला काळजी वाटत होती.’’ पण त्याने आपल्यावर पूर्ण विश्वास टाकल्याचं इशानने सांगितलं.

लहानपणापासूनच ध्येय निश्चित असल्याने आणि त्या दिशेने प्रवास सुरू केला होता त्यामुळे असेल, पण आपण कुठले चित्रपट करणार इथपासून ते आपल्या आईबद्दल-भावाबद्दल त्याची अशी ठाम मतं आहेत. ‘धडक’ आणि ‘बियाँड द क्लाऊड्स’ हे काही टिपिकल बॉलीवूड हिरोला लाँच करण्यासाठीचे चित्रपट नाहीत. त्याबद्दल बोलताना ‘लाँच’ या शब्दावरच आपला विश्वास नाही, असं तो म्हणतो. मी एकदाच लाँच झालो जेव्हा मला माझ्या आईने जन्म दिला होता, असं मिस्कीलपणे सांगणारा इशान आपला प्रवेश हा वास्तवदर्शी चित्रपटांमधूनच होईल याबद्दल ठाम होता, हे स्पष्ट करतो. मजिदींसारख्या दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळावं अशी इच्छा मी नक्की व्यक्त केली होती; पण त्यांचाच चित्रपट मिळावा.. हे आपलं भाग्यच असल्याचं तो सांगतो. त्याच्या मते वास्तवदर्शी चित्रपट हा कुठला वेगळा विभाग नाही, ती फक्त दिग्दर्शकाच्या मांडणीची शैली आहे. वास्तवाच्या जवळ जाणारे चित्रपटच आपल्या मनाला स्पर्शून जात असतात, त्यामुळे यापुढेही आपल्याला काही एक सांगू पाहणारे आणि तरीही मनोरंजक असतील असे चित्रपट करायचे आहेत हेही तो स्पष्ट करतो.

‘धडक’ हा त्याचा चित्रपट नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. एकीकडे ‘बियाँड द क्लाऊड्स’मध्ये तो मुंबईच्या झोपडपट्टय़ांमधून राहणारा, हुशार पण परिस्थितीमुळे ड्रग्जच्या व्यवसायात अडकलेला कोवळा तरुण रंगवतो आहे, तर दुसरीकडे ‘धडक’मध्ये ऑनर किलिंगचा विषय आहे. ‘सैराट’ मी दोन वेळा पाहिला आहे. मला चित्रपट खूप आवडला होता आणि असा चित्रपट गरजेचा आहे असं मला वाटलं, असं तो सांगतो. ‘‘चित्रपट या माध्यमात माणसांना जोडून घेण्याची ताकद आहे. समाजात असे काही  मुद्दे आहेत ज्याबद्दल बोलणं, एखादी भूमिका घेणं गरजेचं आहे. ते मुद्दे चित्रपटासारख्या कलाकृतीतून सुंदरपणे लोकांपर्यंत नेता येतात. त्याचा त्या दृष्टीनेच वापर झाला पाहिजे,’’ असं तो म्हणतो. अशा वेळी चित्रपट मनोरंजक असला किंवा वेगळा विषय मांडणारा असला तरी त्याने फरक पडत नाही. तो लोकांच्या मनाला भिडला तर त्याला यश मिळतंच.’’ ‘सैराट’च्या यशावरून हे सिद्ध झालं आहे, हे इशान म्हणतो तेव्हा भाषा-विषय कुठलंही बंधन न मानता त्याने या माध्यमाचा केलेला अभ्यास सहज लक्षात येतो. ‘बियाँड द क्लाऊड्स’चा विषयच वास्तव आहे असं नाही तर त्याचं चित्रीकरणही मुंबईतील झोपडपट्टीत झालं आहे. ‘‘सेटपेक्षा वास्तव ठिकाणी जेव्हा चित्रीकरण करता तेव्हा त्याचा परिणाम जास्त असतो. मजिदींनी ज्या पद्धतीने मुंबईचं चित्रीकरण केलं आहे तसं अजून कोणीही केलेलं नाही. त्यांना कुठलीच भीती वाटत नव्हती की, अरे मुंबईत या ठिकाणी चित्रीकरण कसं करायचं? काही अडचणी तर येणार नाहीत ना.. काही नाही. एकदम बाजीगरप्रमाणे त्यांनी हे चित्रीकरण केलं आहे.’’ तुमचं नेतृत्वच असं असेल तर तुमचा दृष्टिकोनच बदलतो, हेही तो ठामपणे सांगतो.

त्याच्या आयुष्यात आई आणि भाऊ या दोघांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, मात्र एक अभिनेत्री म्हणून आई कायम बेजबाबदारपणे वागली आहे, अशी त्याची प्रेमळ तक्रार आहे. तिने अभिनेत्री म्हणून, एक नृत्यांगना म्हणून लौकिक कमावला, पण त्यांचं कुठलंच काम, पुरस्कार त्यांनी जपून ठेवलेलं नाही. आईची एक गाजलेली मालिका मी स्वत: कुठून कुठून शोधून पाहिली. तिने आपली कला आमच्यासाठी समर्पित केली. मला आणि माझ्या भावाला ती खूप महत्त्व देते, आमची काळजी घेते आणि हेच तिचं मोठेपण आहे. चित्रपटांची तालीम मला खरं म्हणजे तिच्याकडूनच मिळाली आहे, असंही तो सांगतो.

‘मीच माझा आदर्श ’

माझे खूप आदर्श आहेत. कोणा एकाला मला आदर्श म्हणून समोर ठेवून पुढे जायचं नाही. माझी स्वत:ची अशी एक प्रतिमा माझ्या मनात आहे आणि मला त्या प्रतिमेचा पाठलाग करायची, त्याप्रमाणे होण्याची इच्छा आहे. माझा एक खूप आवडता हॉलीवूड अभिनेता आहे मॅथ्यू मॅकॉने ज्याने ‘डॅलस बायर्स क्लब’ या चित्रपटात काम केलं आहे आणि त्याला या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कारही मिळाला आहे. त्याने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, माझा आदर्श हा दहा वर्षांनंतर मीच स्वत: असेन. त्यामुळे दहा वर्षांनी जेव्हा मी माझ्या आदर्श प्रतिमेपर्यंत पोहोचेन तेव्हा मला लक्षात येईल की, मला अजून दहा वर्ष जगावं लागणार आहे. तर आपल्याच प्रतिमेचा हा वेध घेणं तुम्हाला सतत तुमच्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी प्रयत्न करायला भाग पाडतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2018 3:31 am

Web Title: ishaan younger brother of actor shahid kapoor ready to debut in bollywood
Next Stories
1 नाटय़ परिषदेतील सत्तांतराने रंगभूमीचा चेहरा बदलणार?
2 सूड-संवाद !
3 निक फ्यूरी ‘ब्लॅक पँथर’वर अद्याप नाखूशच
Just Now!
X