दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या ‘सडक २’ या चित्रपटातील गाण्यावर कॉपीचा आरोप करण्यात आला आहे. ‘सडक २’मधील ‘इश्क कमाल’ हे गाणं एका पाकिस्तानी गाण्याची कॉपी असल्याचा आरोप पाकि‍स्तानी म्यूजिक प्रोड्यूसर शहजन सलीम याने केला होता. आपला आरोप सिद्ध करण्यासाठी त्याने एक व्हिडीओ देखील पोस्ट केला होता. मात्र हा आरोप ‘सडक २’चा संगीत दिग्दर्शक सुनीलजीत याने फेटाळून लावला आहे. आम्ही कुठल्याही गाण्याची कॉपी केलेली नाही असं त्याने म्हटलं आहे.

डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार सुनीलजीतने ‘इश्क कमाल’ गाणं कॉपी केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. “मी कुठलंही गाणं कॉपी केलेलं नाही. रब्बा हो हे पाकिस्तानी गाणं मी यापूर्वी कधीही ऐकलं नव्हतं. माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. सडक २ या चित्रपटातून मी एक संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतोय. चित्रपटातील प्रत्येक गाण्यावर आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे कृपया अशा अफवा पसरवू नका.” अशी विनंती सुनीलजीतने केली आहे.

आणखी वाचा- म्हणून ‘सडक २’ ठरला यूट्यूबवरील सर्वात डिसलाइक मिळणारा ट्रेलर

काय म्हणाला होता पाकि‍स्तानी म्यूजिक प्रोड्यूसर शहजन सलीम?

“काही दिवसांपूर्वी मी सडक २ या चित्रपटातील इश्क कमाल हे गाणं ऐकलं. हे गाणं यापूर्वी देखील कुठेतरी ऐकल्याचं मला वाटत होतं. अखेर थोडा विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की अशाच एका गाण्याचं कॉम्पोजिशन मी २०११ मध्ये केलं होतं. त्या गाण्याचं नाव रब्बा हो असं होतं. हे गाणं सडक २ चित्रपटात हुबेबुब कॉपी करण्यात आलं आहे.” असं म्हणत शहजन सलीम याने इश्क कमाल या गाण्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय आपला आरोप सिद्ध करण्यासाठी त्याने दोन्ही गाण्यांचे व्हिडीओ देखील पोस्ट केले होते.