‘इश्कबाज’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेणू पारिख करोनामुक्त झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून तिने या काळातील तिचा अनुभव शेअर केला आहे. सोबतच रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा दिनक्रम कसा होता हेदेखील तिने ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

“करोना हे नाव ऐकल्यावर प्रत्येकालाच भीती वाटते. माझ्या बाबतीतही तसंच झालं होतं. करोना चाचणी करण्यापूर्वीच माझ्यात रोज एक नवीन लक्षण दिसून येत होतं. त्यामुळे या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी मी स्वत:ला मानसिकरित्या तयार केलं होतं. कारण सांगता येत नाही मला करोना झाला तर? पण खरं सांगू का, जेव्हा सकाळी डॉक्टरांनी केलेल्या फोनमुळे मला जाग आली तेव्हा मी दोन मिनीटं स्तब्धच झाले होते. डॉक्टरांनी मला सांगितलं की मी करोना पॉझिटिव्ह आहे. मला काहीच सुचलं नाही. जसं मालिकेत ब्लॅकआऊट होतो, तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. त्यावेळी पटकन बॅगेत कपडे भर आणि हॉस्पिटलमध्ये जा असं मला डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर मला सगळ्यात प्रथम ही माहिती माझ्या आई-वडिलांना द्यायची होती. पण हे सगळं सांगताना गोंधळून किंवा घाबरुन जायचं नाहीये हे माझ्या डोक्यात होतं आणि मला सगळ्यात जास्त भीती वाटत होती की माझ्यामुळे माझ्या कुटुंबातील कोणत्याच व्यक्तीला माझ्यामुळे संसर्ग व्हायला नको”, असं श्रेणू म्हणाली.

पुढे ती म्हणते, “जेव्हा डॉक्टरांनी मला मी पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं त्यावेळी नकळत माझ्या डोळ्यातून अश्रू आले. इश्कबाज या मालिकेमुळे मला खूप चांगली माणसं आणि मित्र मिळाले. मी पॉझिटिव्ह असल्याचं माझ्या सहकलाकारांना सांगितलं आणि त्यांनी माझी फार मदत केली. मला पाठिंबा दिला. कारण मी आई-वडिलांसमोर रडून व्यक्त होऊ शकत नव्हते. परंतु मित्र-मैत्रिणींसमोर मी मनमोकळेपणे रडले”.

श्रेणू छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘भ्रम…सर्वगुण संपन्न’ या मालिकेतून तिने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘इश्कबाज’, ‘इस प्यार को क्या नाम दू’, ‘दिल बोले ओबेरॉय’, ‘ब्याह हमारी बहु’ या मालिकांच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.