भारताच्या मंगळ मोहिमेची खरी कथा दाखविणारा ‘मिशन मंगल’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिका साकरत असून हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर सोशल मीडियावर या ट्रेलरची चर्चा रंगत असून भारतीय अवकाश संसोधन संस्थेने (ISRO) या ट्रेलरचं कौतुक केलं आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये मंगळ मोहिमेची योजना आखण्यापासून ती यशस्वी करण्यापर्यंतचा प्रवास दाखविण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये मंगळ मोहिम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी टीमने घेतलेली मेहनत, त्यांचं ध्येय या साऱ्या गोष्टी अधोरेखित करण्यात आल्या आहेत, त्यामुळे इस्त्रोने या ट्रेलरचं कौतुक केलं आहे.

“ज्यांच्यासोबत इस्त्रोची टीम काम करते, त्या साऱ्यांच्या भावना आणि ध्येय ‘मिशन मंगल’च्या ट्रेलरमध्ये सुंदररित्या दाखविण्यात आल्या आहेत”, असं ट्विट इस्त्रोकडून करण्यात आलं आहे.

इस्त्रोच्या या ट्विटनंतर अभिनेता अक्षय कुमारने इस्त्रोचे आभार मानले आहेत. “मिशन पूर्ण झालं आहे. आम्हाला अशी प्रेरणादायी कथा सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशी संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे, हे सारं मी मिशन मंगलच्या टीमच्या वतीने बोलत आहे”, असं म्हणत अक्षयने आभार मानले.

दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन जगनशक्ती करत असून हा चित्रपट नोव्हेंबर २०१३ मध्ये इस्त्रोने केलेल्या मंगळयानाच्या प्रोजेक्टवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अक्षयव्यतिरिक्त विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी,कृति कुल्हारी हे कलाकार झळकणार आहेत.