X

”माझ्या कुटुंबाची पाळंमुळं पाकिस्तानात”; सोनमच्या वक्तव्यावर नेटकरी भडकले

या मुलाखतीत सोनमने काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यावरही नेटकऱ्यांनी टीका केली.

५ ऑगस्ट २०१९ रोजी काश्मीरचे भवितव्य ठरवणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. हा निर्णय म्हणजे अनुच्छेद ३७० रद्द करून जम्मू काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत करण्यात आलेले विभाजन. या निर्णयाचे देशभरातून स्वागत झाले. अभिनेत्री सोनम कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काश्मीरबाबत वक्तव्य केले आहे. सध्याची परिस्थिती मन हेलावून टाकणारी आहे. परंतु मी खूप देशभक्त आहे, असं ती म्हणाली आहे.

‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत सोनम काश्मीर मुद्द्यावर म्हणाली, ”माझ्यासाठी सध्या शांत राहणंच योग्य आहे. कारण हा काळ सुद्धा निघून जाईल. आपला देश ७० वर्षांपूर्वी एकसंध होता आणि आताचं विभाजनशील राजकारण पाहून मन हेलावून जातंय,” अशी भावना तिने व्यक्त केली. काश्मीर मुद्द्यावर सोनमचं मत विचारलं असता पूर्ण माहिती मिळाल्यावरच बोलू शकणार असल्याचं ती म्हणाली. ”हे प्रकरण फार गुंतागुंतीचं आहे आणि मला त्यातलं फार काही माहीत नाही. कारण सगळीकडे इतक्या विरोधी बातम्या आहेत की सत्य काय हेच मला कळत नाही. सध्याच्या परिस्थितीत शांतता ठेवणं आणि काय घडतंय हे पाहणं यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे जेव्हा माझ्याकडे पूर्ण माहिती असेल तेव्हाच मी यावर मत मांडू शकेन,” असं ती म्हणाली.कुटुंबाचं नातं पाकिस्तानशी कसं जोडलं गेलं आहे हेसुद्धा तिने या मुलाखतीत सांगितलं. सिंधी असल्यासोबतच मी पेशावरीसुद्धा आहे असं ती म्हणाली. मात्र सोनमचं विधान नेटकऱ्यांना रुचलं नाही. सोनमने पुन्हा एकदा बेताल वक्तव्य केल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. काहींनी तिला थेट पाकिस्तानात जाऊन राहण्याचा सल्ला दिला.

एखाद्या वक्तव्यामुळे सोनम ट्रोल झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने मांडलेल्या मतांसाठी तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

First Published on: August 19, 2019 1:02 pm