बॉलीवूडच्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटासंदर्भात निर्माण झालेल्या सेन्सॉरशिपच्या मुद्द्यावर दिग्दर्शक अनुराग कश्यप याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सेन्सॉर बोर्डाने ‘उडता पंजाब‘मधून पंजाब, राजकारण आणि निवडणुकीबद्दलचे संदर्भ काढून टाकण्यास सांगितले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या अनुरागने आपण उत्तर कोरियातील हुकुमशाही राजवटीत राहतोय की काय असा प्रश्न उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली. ट्विटरवरून संताप व्यक्त करताना अनुरागने म्हटले की, मला नेहमी नवल वाटायचे की उत्तर कोरियामध्ये नागरिक कसे राहत असतील. पण मला आता विमान पकडायची गरज नाही. कारण इथे तेच अनुभवयास मिळत आहे. ‘उडता पंजाब’ हा आजपर्यंतचा खूपच प्रामाणिक चित्रपट आहे. या चित्रपटाला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांना खरतरं पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या नशेचा फैलाव रोखू शकलो नाही, याबद्दल लाज वाटायला हवी, असेही अनुरागने म्हटले आहे. या चित्रपटाच्या नावाला व कथानकाला पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, सुखबीर बादल व अकाली दल या सत्ताधारी पक्षाने विरोध केला आहे.
अनुराग कश्यप या चित्रपटाचा निर्मात्यांपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून सेन्सॉर बोर्डाकडून मंजुरी मिळत नसल्यामुळे ‘उडता पंजाब’चे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा चित्रपट पंजाबमध्ये फोफावलेल्या अमली पदार्थाच्या व्यसनावर आधारित आहे. शाहिद कपूर, आलिया भट आणि करीना कपूर या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहेत. ‘उडता पंजाब’ येत्या १७ जून रोजी प्रदर्शित होत आहे.