ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या निधनावर अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी शोक व्यक्त केला. ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत रवी पटवर्धन यांनी निवेदिता यांच्या सासऱ्यांची भूमिका साकारली होती. “रवी काका आपल्यात नाहीत यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही”, असं म्हणताना त्या भावूक झाल्या.
‘ई टाइम्स टीव्ही’शी बोलताना त्या म्हणाल्या, “मालिकेतील माझी सर्व दृश्ये त्यांच्यासोबत होती. त्यांच्या निधनाच्या वृत्तावर माझा विश्वासच बसत नाही. ते ऑनस्क्रीन माझ्या सासऱ्यांची भूमिका साकारत होते. या वयातही ते सर्व गोष्टींचा ताळमेळ अत्यंत सुरेख पद्धतीने राखतात, असं आम्ही सतत बोलायचो. त्यांनी कधीच कोणाची मदत घेतली नव्हती. आयुष्यात कधीही हार मानू नये, ही मोलाची शिकवण त्यांनी मला दिली. वयाच्या ८३व्या वर्षी ते काम करत होते.”
रवी पटवर्धन यांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. “त्यांच्या पायाला दुखापत झाली होती आणि तरीही ते सेटवर आले होते. ते कसं काम करू शकतील अशी चिंता आम्हाला सतावत होती. पण त्यांनी कोणाला काहीच त्रास न देता किंवा मदत न घेता सर्व काही काम पूर्ण केलं. त्यांनी मला खूप काही शिकवलं. दोन दिवसांपूर्वीच आम्ही ते सेटवर पुन्हा कामाला येतील असं बोलत होतो. पण आता ते कधीच येऊ शकत नाहीत”, असं म्हणताना निवेदिता सराफ भावूक झाल्या.
रवी पटवर्धन यांनी वयाच्या ८४व्या वर्षी ठाण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेली पन्नास वर्षे त्यांनी मराठी नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून मनोरंजन करण्याचं काम केलं. ‘अग्गंबाई सासूबाई’ ही त्यांची शेवटची मालिका ठरली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 7, 2020 8:08 am