प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचे वडिल प्रकाश पादुकोण यांनी नुकतेच एक वक्तव्य केले आहे. वडिलांनी खेळात करीयर केलेले असताना चित्रपटसृष्टीत जाण्याचा विचार केलेल्या दीपिकाबद्दल ते काही वेळा व्यक्तही झाले आहेत. मात्र आता त्यांनी दीपिकाने चित्रपसृष्टीत यायचे ठरवल्यावर आपल्याला तिची कशी काळजी वाटायची याबाबत सांगितले आहे. तिने चित्रपटसृष्टीत जायचे ठरवले आणि त्यासाठी मुंबईला जाण्याचेही ठरवले. त्यावेळी ती केवळ १८ वर्षांची होती. मुंबईत तिला राहण्यासाठी जागाही नव्हती त्यामुळे आम्हाला तिची काळजी वाटायची असे ते म्हणाले. आमच्यासाठी तिने घेतलेला हा निर्णय पचवणे ही काहीशी अवघड गोष्ट होती असेही त्यांनी सांगितले. पण आता मागे पाहिले तर तिने घेतलेला निर्णय योग्य होता हे पटते असेही ते म्हणाले.

१७ व्या वर्षी बलिवूडमध्ये जाण्याचे ठरवलेली दीपिका याबाबत म्हणते, मी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला तेव्हा फार विचार केला नव्हता. पण आता मागे वळून पाहताना तो महत्त्वाचा निर्णय ठरला असे ती म्हणाली. माझ्या पालकांना त्यावेळी मी लहान वयात घराबाहेर पडतीये याबाबत काळजी वाटणे स्वाभाविक होते. पण मला आयुष्यात काहीतरी मोठे करुन दाखवायचे होते. मला माहित आहे माझ्या काळजीने ते अनेक रात्री झोपले नसतील पण मला गाठायच्या असलेल्या ध्येयाची मला नेमकी माहिती होती. मला कुठे जायचे आहे हे माहित असल्याने मी तेव्हा जास्त विचार न करता निर्णय घेतला होता. आज मला त्याची किंमत मला कळत आहे असेही ती म्हणाली.