अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा संपला, पण सोशल मीडियावर अजूनही ट्रम्प यांची आणि त्यांची मुलगी इव्हांका हिची चर्चा सुरूच आहे. सोशल मीडियावर इव्हांकाचे अनेक मीम्स शेअर केले जात आहेत. इव्हांका स्वतःही नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रियांची मजा घेताना दिसतेय, याचा पुरावा इव्हांकाने केलेल्या एका ट्विटमुळे मिळालाय.

प्रसिद्ध पंजाबी सिंगर आणि अभिनेता दिलजीत दोसांझ याने इव्हांका ट्रम्पसोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता. एडिट केलेला हा फोटो प्रचंड व्हायरल झाला. हा फोटो इव्हांकाच्या ताजमहल दौऱ्यातला होता. दिलजीतने हा फोटो एडिट करुन इव्हांकाच्या बाजूला स्वतःला बसलेलं दाखवलं आणि “इव्हांका ट्रम्प ताजमहल पाहण्याचा हट्ट करत होती, अखेर मी तिला ताजमहल दाखवला”… अशा आशयाचं ट्विट केलं. त्याने ट्विट केलेला हा फोटो मोठ्या प्रमाणाच व्हायरल झाला. त्यानंतर, आता इव्हांकाने स्वतः दिलजीतच्या त्या ट्विटवर मजेशीर रिप्लाय दिला आहे. “मला अप्रतिम ताजमहल दाखवल्याबद्दल आभार, हा अनुभव मी कधीच विसरणार नाही”, असं ट्विट तिने केलं आहे. तिचा रिप्लाय आलेला पाहून दिलजीतच्या आनंदाला तर पारावार उरला नाही. त्यानेही तातडीने, “धन्यवाद इव्हांका…मी सगळ्यांना सांगून सांगून थकलो की हा फोटो खोटा नाहीये…भेटू लवकरच…पुढच्या वेळेस लुधियानाला जाऊ…”असा रिप्लाय केला आहे.

दरम्यान, दिलजीतने ट्विट केलेल्या त्या फोटोनंतर नेटकरी इव्हांका ट्रम्पचे विविध फोटो एडिट करुन पोस्ट करत आहेत. दिलजीत दोसांझने बॉलिवूड सिनेमा ‘उडता पंजाब’मधून पदार्पण केलं होतं, काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारसोबत त्याचा ‘गुड न्यूज’ हा सिनेमाही आला होता. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत तो मुख्य भूमिकेत होता.