रेश्मा राईकवार

जबरिया जोडी

इथूनतिथून गोंधळलेल्या पिढीची गोंधळलेली प्रेकमथा दाखवण्याचा एकच चंग बॉलीवूडने बांधला असावा, हे वारंवार जाणवून देणारे चित्रपट डोळ्यांसमोर येतात. सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा या जोडीचा ‘जबरिया जोडी’ हा त्या कंटाळवाण्या चित्रपटांच्या यादीतला नवा चित्रपट ठरला आहे. सातत्याने टिपिकल बॉलीवूडी साच्यातील जे प्रेमपट प्रदर्शित होतायेत त्यात देशभरातील कुठल्या तरी भागातील एक समस्या उचलून तिचा तडका देत तेच तेच प्रेक्षकांच्या माथी मारण्याचा हा प्रयत्नही आता नित्याचा झाला आहे. कधी तो कानपूरमधील हुंडय़ाचा विषय असतो, तर कधी बिहारमधला जबरदस्ती चांगल्या तरुणांना उचलून लग्न लावण्याचा प्रकार असतो. या चित्रपटातही हाच जबरदस्तीचा मामला आहे, फक्त इथे हुंडय़ापायी लग्न होत नाहीत म्हणून मुलीच अशा प्रकारे जबरदस्ती चांगल्या मुलांना पकडून त्यांच्याशी लग्न लावण्याचा डाव खेळताना दिसतात. अर्थात, हा डाव तुटेपर्यंत ताणला आहे..

बिहारमध्ये माधोपूर भागात हुकुन देव सिंग (जावेद जाफरी)चे प्रस्थ आहे. हुंडय़ामुळे ज्या मुलींची लग्न होत नाहीत, त्यांना त्यांच्या आवडीचा वर शोधून देऊन त्याला जबरदस्तीने पकडून त्या मुलींशी लग्न लावून देण्याचे पुण्याचे काम हुकुन देव आपल्या मुलाच्या अभय सिंगच्या (सिद्धार्थ मल्होत्रा) मदतीने करत असतो. वडिलांनी सांगितलेले हे काम पुण्याचे आहे असे भासत असले तरी ते सगळ्याच अर्थाने बरोबर नाही याची जाणीव असलेला अभय केवळ वडिलांच्या धाकामुळे आणि आईला आपल्या वागण्याचा त्रास होऊ नये म्हणून निमूटपणे हे काम करतो आहे. त्याचे हे काम असेच सुरू राहते, मात्र त्याच्या आयुष्यात त्याची बालमैत्रिण बबली यादवचा (परिणिती चोप्रा) प्रवेश होतो. बबली सुशिक्षित आहे आणि हुंडा न घेता चांगल्या मुलाशी लग्न करण्याचा तिचा इरादा दर वेळी तिच्यासमोर येणारे नवनवीन वर नमुने हाणून पाडतात. बबलीसाठीही असाच जबरिया नवरा शोधण्याचा प्रस्ताव बबलीचे वडील अभयसमोर ठेवतात. या सगळ्या गोंधळात अभय आणि बबलीच्या प्रेमाचा धागा दिग्दर्शकाने  शेवटपर्यंत ताणून धरला आहे.

‘जबरिया जोडी’ या चित्रपटात नवीन काय असेल, तर हा जबरदस्तीने कराव्या लागणाऱ्या लग्नांचा भाग आहे. बिहारसारख्या शहरात जिथे एक तर मुले अशिक्षित आहेत आणि जी शिकून-सवरून चांगल्या नोकरीला लागतात, तीही मंडळी लग्नाचा उपयोग केवळ हुंडा घेण्यासाठीच करतात. शिकून नोकरी मिळवायची, पैसेवाल्यांची मुलगी शोधून तिच्या बापाकडून गाडी, घर, लाखोंच्या घरातील रक्कम आणि दागिने मिळवून सदासुखी व्हायचे, असा हा प्रस्थापित फंडा. त्यामुळे उच्चशिक्षित असूनही मुलींना चांगला जोडीदार शोधण्याचा पर्यायच उपलब्ध नाही आहे. या शोकांतिकेला उत्तर म्हणून लेखक संजीव झा आणि दिग्दर्शक प्रशांत सिंग या जोडीने मुलींसाठी होणाऱ्या या जबरिया लग्नाचा घाट घातला आहे. उपहास म्हणून किंवा दुर्दैवी वास्तव म्हणूनही याचा विचार केला तरी त्यापलीकडे चित्रपट यावर उत्तर शोधत नाही. ना या चित्रपटाचा रांगडा नायक जो आईची परिस्थिती बघून मनातल्या मनात कुढतो तो वडिलांविरुद्ध संघर्ष उभा करायची ताकद दाखवत, ना या चित्रपटाची नायिका जी जात्याच बंडखोर आहे ती स्वत:च्या प्रेमाव्यतिरिक्त इतरांसाठी याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत.. केवळ आणि केवळ नायक-नायिकेचे गोंधळलेले प्रेम दाखवण्यातच लेखक-दिग्दर्शकाचे श्रम खर्ची पडले आहेत.

त्यातल्या त्यात काहीएक व्यक्तिरेखांची मांडणी करताना दिग्दर्शकाने संवेदनशीलता दाखवली आहे. त्यामुळे बबलीचे वडील (संजय मिश्रा), अभयची आई (शीबा चढ्ढा), गुंडगिरी करत असला तरी अभयचा मित्र गुड्डु (चंदन रॉय सन्याल) आणि

बबलीचा मित्र संतो (अपारशक्ती खुराणा) या काही व्यक्तिरेखा आहेत ज्या चित्रपटात थोडासा का होईना जीव आणतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नायिका इथे रडते, पण बीअर पिऊन धडाही शिकवताना दिसते. प्रेम मागत बसत नाहीत किं वा त्यासाठी वाट बघत नाही. ती आपला निर्णय घेऊन मोकळी होते, इतपत बदल दाखवण्याचा थोडका का होईना दिग्दर्शकाचा प्रयत्न थोडासा सुखावून जाणारा आहे; पण यापलीकडे काही नाही.

चित्रपटातील मुख्य जोडी सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणिती चोप्रा हे दोघेही उत्तम कलाकार आहेत आणि त्यांनी कामही उत्तम केले आहे. मात्र कथेतच काही दम नाही. त्यामुळे त्यांना काही वेगळे करता आलेले नाही. सिद्धार्थला त्याची अ‍ॅक्शन दाखवण्यासाठी पुरेसा वाव देण्यात आला आहे इतकंच.. परिणिती चोप्राला यापेक्षा चांगल्या, दमदार भूमिकांमध्ये प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे. इतर सगळे कलाकार अगदी जावेद जाफरीपासून अपारशक्ती खुराणापर्यंत तगडय़ा कलाकारांची फौज आहे. त्यांचा अभिनय, मांडणीतला खुसखुशीतपणा यामुळे हा जबरिया ताणलेला चित्रपट सहन करण्याचे बळ तरी मिळते..

* दिग्दर्शक – प्रशांत सिंग

* कलाकार – सिद्धार्थ मल्होत्रा, परिणिती चोप्रा, शीबा चढ्ढा, जावेद जाफरी, संजय मिश्रा, चंदन रॉय सन्याल, अपारशक्ती खुराणा