चित्रपट उद्योगक्षेत्रात अ‍ॅक्शनपट म्हणजे जणू यशाची खात्री असे समीकरण होत चालले आहे. त्यामुळेच की काय आज मोठमोठय़ा निर्मात्यांनी आपला मोर्चा अ‍ॅक्शनपटांच्या दिशेने वळवला आहे. परंतु आजचे अ‍ॅक्शन हिरो म्हणजे जणू सर्कशीतले विदूषकच वाटतात, अशा मिश्कील शब्दांत अभिनेता जॅकी चॅनने एका मुलाखतीदरम्यान सिनेसृष्टीतील सद्य परिस्थितीवर टीका केली आहे. सिनेमा हे अभिनयाचे क्षेत्र असून नृत्य व अ‍ॅक्शनचा वापर एखाद्या व्यक्तिरेखेचा प्रभाव वाढवण्यासाठी केला जावा, परंतु दुर्दैवाने अभिनयापेक्षा नाचकाम व मारामारीवरच जास्त लक्ष केंद्रित केले जाते, अशी खंत जॅकीने व्यक्त केली. पुढे त्याने सुपर हिरो या संकल्पनेवरही आपले मत व्यक्त केले. अ‍ॅक्शनपटांचा पुढचा टप्पा म्हणजे सुपर हिरोपट होय. आपल्या सुपरशक्तींच्या जोरावर सैतानी संकटांपासून मानव संस्कृतीचे रक्षण करणारे हे हिरो जॅकीला मात्र बोगस वाटतात. त्याच्या मते सुपर हिरो म्हणजे आकाशात उडणे, इमारतींवरून उडय़ा मारणे, दहा-पंधरा शत्रूंना एकत्र मारणे यांसारख्या काही चुकीच्या समजुती सिनेक्षेत्राने आपल्या मनावर बिंबवल्या आहेत. प्रत्येक माणूस जन्मत: हिरो असतो. आपल्या आई-वडिलांनी आपल्यावर केलेले संस्कार म्हणजे आपल्याकडे असलेली शक्ती होय. आणि या शक्तीचा योग्य वापर करून सुपर हिरो बनता येते असे जॅकीला वाटते. पुढे त्याने एखाद्याला मारण्यापेक्षा अपघातग्रस्त व्यक्तीला इस्पितळात पोहोचवतो तो खरा हिरो, एखाद्या अंध व्यक्तीला रस्ता ओलांडण्यास मदत करतो तो खरा हिरो, प्रवास करताना वृद्ध किंवा गरोदर बाईला आपल्या जागेवर बसू देतो तो खरा हिरो. अशा लहान लहान कामांतून आपल्या पालकांनी व शिक्षकांनी दिलेल्या शिकवणीचा योग्य वापर करून आपल्याला आपले सुपर हिरोत्व सिद्ध करता येते. लहान मुलांवर सुपर हिरोंचा प्रचंड प्रभाव आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीचे अनुकरण ते करतात. त्यामुळे सुपर हिरो व्यक्तिरेखा उभारताना दिग्दर्शकाने थोडे सामाजिक भान ठेवणे गरजेचे आहे, असे मत त्याने व्यक्त केले.