जाती व्यवस्था, धर्मभेद, वर्णभेद याबरोबरच समलैंगिकता हा जगभरातील सर्वच समाजव्यवस्थांमधील एक गंभीर प्रश्न आहे. समलैंगिकतेला कायद्याने मान्यता मिळाली असली तरी ही मंडळी अद्याप सामाजिक मान्यता व सुरक्षिततेपासून वंचित आहेत. त्यांच्याकडे मतदान करण्याचा हक्क आहे, मात्र जगण्याचा हक्क त्यांच्याकडून हिरावून घेतला जात आहे. अशाच काहीशा अवस्थेत सुपरस्टार जॅकी चॅनची मुलगी एटा नेग चोक लाम आहे.

एटाचा नुकताच एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. त्यात तिने आपण समलैंगिक असल्याचे मान्य करत लोकांकडे मदतीची याचना केली आहे. एटा ही जॅकी चॅन व अभिनेत्री इलेन नेग यी ली यांची मुलगी आहे. घरात सतत आई-वडिलांमध्ये होणाऱ्या भांडणांना कंटाळून तिने घर सोडले व ती एकटी राहू लागली. आता ती १८ वर्षांची आहे. तिच्या प्रेयसीचे नाव अँडी अ‍ॅटम असे आहे. दोघांनी एका व्हिडीओ मार्फत आपल्या सद्यपरिस्थितीचे वर्णन केले. तसेच त्यांनी लोकांकडे मदतीची याचनाही केली आहे. सध्या हे जोडपे हाँग काँग शहरात असून लवकरच ते कॅनडामध्ये स्थायिक होणार आहेत. त्यांच्या मते चीनमध्ये समलैंगिकतेला कायद्याने मान्यता असली तरी त्याला सामाजिक मान्यता मिळत नाही. दोघांच्या प्रेमसंबंधांची माहिती जेव्हा शाळेच्या मुख्याध्यापकांना मिळाली तेव्हा त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. पुढे पोलिसांनीही त्यांना मदत करण्यास नकार दिला. समाजसेवेचा दावा करणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांनीही त्यांच्यासाठी मदतीचे दार बंद केले. मालकाने घराबाहेर काढल्यानंतर त्यांना राहण्यासाठी निवारा मिळत नव्हता. शेवटी अनेक दिवस त्यांनी फुटपाथवर झोपून काढले आहेत. दरम्यान, काही मित्रमंडळींनी त्यांना आर्थिक मदत केली.

इंटरनटेवर मदतीसाठी याचना करणारे शेकडो व्हिडीओ रोज अपलोड होत असतात. परंतु एटा नेग चोक लाम ही सुपस्टार जॅकी चॅन’ व इलेन नेग यी ली यांची मुलगी असल्यामुळे या व्हिडीओला विशेष प्रसिद्धी मिळते आहे. जॅकीच्या अनेक चाहत्यांनी हा व्हिडीओ त्याला टॅग केला असून आता ते त्याच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रियेची वाट पहात आहेत.