एकेकाळी बॉलिवूडमधील अतिशय हिट जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे अभिनेते जॅकी श्रॉफ आणि अभिनेते अनिल कपूर. चित्रपटांसोबतच त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील मैत्रीचे देखील किस्से चर्चेत असायचे. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘राम लखन’ या चित्रपटाच्यावेळी त्या दोघांमध्ये चांगले मैत्रीचे नाते निर्माण झाले होते. पण एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जॅकी श्रॉफ यांनी अनिल कपूरच्या १७ वेळा कानशिलात लागावली होती.

जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांचा राम लखन हा चित्रपट हिट ठरल्यानंतर त्यांनी ‘परिंदा’ चित्रपटात पुन्हा एकत्र काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन विधु विनोद चोप्रा यांनी केले होते. जेव्हा या चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण झाली तेव्हा अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांनी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला होता.

आणखी वाचा : अमिताभ यांनी खरेदी केले ३१ कोटी रुपयांचे नवे घर, बिग बी झाले सनी लिओनीचे शेजारी

दरम्यान ‘परिंदा’ या चित्रपटाविषयी बोलताना जॅकी श्रॉफ यांनी १७ वेळा अनिल कपूर यांच्या कानशिलात लगावल्याचा खुलासा केला होता. ‘पहिल्या सीनमध्येच सर्व योग्य पद्धतीने शूट झाले होते. मात्र अनिल कपूर यांना सीन परफेक्ट हवा होता. त्यासाठी मी त्याच्या १७ वेळा कानशिलात लगावली होती’ असे जॅकी श्रॉफ यांनी म्हटले होते.

विधू विनोद चोप्रा यांनी हा व्हिडीओ २०१९मध्ये शेअर केला होता. आता तो पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा ‘मुंबई सागा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण या चित्रपटाला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे म्हटले जात होते.