बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस सध्या विश्व विक्रम करण्यासाठी फार मेहनत घेत आहे. जॅकलिन स्वतःच्या फिटनेसबाबत नेहमीच जागरुक असते. लवकरच ती एक विश्व विक्रम करणार आहे. आज म्हणजे ६ नोव्हेंबरला जॅकलिन ६० सेकंदपर्यंत प्लँक पोझिशनमध्ये राहण्याचा विश्व विक्रम करणार आहे. यात तिच्यासोबत १०० हून अधिक स्त्रियाही सहभाग घेणार आहेत. जॅकलिनने योग्य व्यायाम आणि आगारामुळे आपल्या शरीराची उत्तम निगा राखली आहे. आता फिट राहण्याचा हाच संदेश ती इतरांनाही देणार आहे. यासाठी जॅकलिनने ‘डू यू’ नावाने कॅम्पेनही सुरु केले आहे.

 

जॅकलिनच्या मते, या कॅम्पेनमधून ती मुलींना आयुष्यात पुढे जाण्याचा आणि जशा त्या आहेत त्याच रुपात स्वतःला स्विकार करण्याचा आत्मविश्वास देण्यासाठी ती प्रयत्नशील असणार आहे. तसेच फक्ट डाएट करुन बारीक होता येतं अशी मानसिकता असणाऱ्यांची मानसिकता बदण्यासाठीही ती प्रयत्न करणार आहे.

 

कोणताही विचार न करता आपण जेव्हा डाएट करतो तेव्हा आपण शरीराला आवश्यक ती जीवनसत्व देत नाहीत. त्यामुळे आपणच आजारपणाला आमंत्रण देतो. एका ठराविक वयानंतर सौंदर्य नाही तर शारीरिक स्वास्थ्यच आपल्यासोबत शेवटपर्यंत असतं. जॅकलीनला पुढच्या वर्षी मॅरेथॉनमध्येही सहभागी व्हायचे आहे. मॅरेथॉनसाठी तिने तयारीही सुरु केली आहे.