गतवर्षीपासून कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. सेलिब्रिटींच्या लग्नाची धूम सुरू आहे. आता आणखी एका मराठी सेलिब्रिटीचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. 'जय मल्हार' या मालिकेतील म्हाळसादेवीच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरभी हांडे विवाहबंधनात अडकली आहे. दुर्गेश कुलकर्णी याच्याशी तिने लग्नगाठ बांधली आहे. सुरभी-दुर्गेशच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुळशी येथील प्रसिद्ध ढेपेवाडा येथे हा विवाहसोहळा संपन्न झाला. यावेळी सुरभीने लाल रंगाची नऊवारी साडी आणि बनारसी शेला परिधान केला होता. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. सुरभी आणि दुर्गेश लग्नाच्या आधीपासून एकमेकांना चांगले ओळखत होते. त्यांच्यात चांगली मैत्री होती. दोघांचीही कार्यक्षेत्रं वेगळी आहेत. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 'जय मल्हार' या पौराणिक मालिकेतून सुरभी म्हाळसा या भूमिकेमुळे घराघरात पोहचली होती. तिच्या या भूमिकेला रसिकांना भरभरून पसंती दिली होती. आता सुरभी 'लक्ष्मी सदैव मंगलम' या मालिकेत झळकत आहे.