प्रशांत केणी

‘जयपूर पिंक पँथर्स.. सन्स ऑफ दी सॉइल’ या वेबमालिकेत प्रो कबड्डी लीगमधील एका यशस्वी आणि लोकप्रिय संघाचा एकूण प्रवास अभिप्रेत होता. परंतु या रूढ मार्गाने जाण्याऐवजी पहिल्या हंगामाचे यश थोडक्यात गुंडाळून उर्वरित संपूर्ण वेबमालिका ही फक्त सातव्या हंगामातील संघर्षगाथा म्हणून उरते. दिमाखदार प्रारंभ करून नंतर सांघिक समतोल ढासळल्यामुळे काही सामने गमावणाऱ्या जयपूरचे प्रयत्न बाद फेरी गाठण्यासाठी थिटे पडतात, अशी ही साठा उत्तराची कहाणी असफल, पण संपूर्ण आहे.

प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात जयपूरचा संघ बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरला. त्यांना सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. साखळी टप्प्यातील २२ सामन्यांचा हा संघर्ष कबड्डी रसिकांनी मैदानाच्या रंगमंचावर पाहिला. परंतु ही पाच भागांची वेबमालिका मैदानाच्या पलीकडे जाते. तेथील वास्तव म्हणजेच खेळाडूंचा, प्रशिक्षकांचा, साहाय्यकांचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघमालकांचा दृष्टिकोन सहजपणे मांडतो. ड्रेसिंग रूममधील चित्रणांमध्ये तर अनेक खेळाडूंचे वाभाडे निघाले आहेत. त्यांची वृत्ती कशी संघाला हानीकारक ठरते, हे प्रामाणिकपणे मांडण्याचे धारिष्टय़ एकीकडे कौतुकास्पद असले तरी खेळाच्या पलीकडील हे खेळाडू-प्रशिक्षक-मालक यांच्यातील संबंध जाहीरपणे प्रकट करून या निर्मितीने काय साधले, हा प्रश्न अनुत्तरित राहतो.

२०१४ च्या पहिल्यावहिल्या ‘प्रो कबड्डी लीग’ने कबड्डी या देशी खेळाच्या कक्षा रुंदावल्या. खेळाचे अर्थकारण बदलले आणि खेळाडूंना क्रिकेटपटूंप्रमाणे सेलिब्रेटीचा दर्जा प्राप्त करून दिला. या पहिल्या हंगामात अभिनेता अभिषेक बच्चनच्या मालकीच्या ‘जयपूर पिंक पँथर्स’ने विजेतेपद पटकावून सर्वाचे लक्ष वेधून घेतले. आतापर्यंतच्या सात हंगामांपैकी एक विजेतेपद, एक उपविजेतेपद खात्यावर असलेल्या या संघाचे काही हंगाम अपयशी ठरले. त्यामुळे त्यांचा एकूण प्रवास अपयशी झाला असे म्हणता येणार नाही. पण हे पूर्ण कथानक माहितीपटातून रेखाटण्याऐवजी चाहत्यांना फक्त सातव्या हंगामाची क्षणचित्रे आणि मैदानापलीकडील वास्तववादी नाटय़ अनुभवायला मिळते.

‘दी प्लान’ या पहिल्या भागात म्हणजेच प्रो कबड्डीने कशी कबड्डीपटूंची जीवनशैली बदलली येथून सुरू झालेला कथानकाचा हा प्रवास उत्तम आशा उंचावतो. मग धरमशाला येथील हंगामपूर्व सराव शिबीर दाखवण्यात आले आहे. ‘द राइस’ या दुसऱ्या भागात जयपूरने सुरुवातीचे सामने जिंकून गुणतालिकेत घेतलेली मुसंडी अधोरेखित करते. ‘द होप’ या तिसऱ्या भागात ‘दबंग दिल्ली’कडून पत्करलेल्या पहिल्या पराभवानंतर आशा-निराशेच्या हिंदोळ्यावरील अनेक क्षण संघातील उणिवा समोर आणतात. ‘द फॉल’ या चौथ्या भागात अपेक्षेप्रमाणेच संघाची घसरण पाहायला मिळते. संघातील खेळाडूंचे कच्चे दुवे यातून स्पष्ट होतात. कर्णधार दीपक हुडाची निर्णायक चढाई निष्फळ ठरते आणि सामना बरोबरीत सुटतो. या चढाईनंतर प्रशिक्षक-मालक दीपकवर निशाणा साधतात. सलग चार पराभवांमुळे बाद फेरीसाठी शेवटच्या सहापैकी पाच लढती जिंकण्याचे आव्हान पेलण्यात जयपूरला अपयश येते, हेच ‘एण्ड ऑफ द रोड’ या अखेरच्या भागात दाखवण्यात आले आहे.

पाच भागांचे एकंदर विश्लेषण करताना खेळाडूंमधील आपापसातील आणि प्रशिक्षकांशी असलेले संबंध (जसेच्या तसे दाखवून) चव्हाटय़ावर आणले आहेत. एक कोटी २६ लाख रुपयांच्या बोलीवर संघात घेतलेल्या दीपकला संघापेक्षा वैयक्तिक कामगिरी महत्त्वाची वाटते. कधीही सराव आणि आहारासाठी वेळेत न पोहोचणाऱ्या दीपकमध्ये नेतृत्वगुणाचा कमालीचा अभाव सिद्ध होतो. हे त्याचे अनेक वैगुण्य संघाच्या अपयशाला कारणीभूत ठरतात. हे अखोरेखित करणाऱ्या घटना यात दाखवल्या आहेत. संघाचा मुख्य कार्यकारी अधिकारी बंटी वालिया अपयशासाठी दीपकला जबाबदार धरताना तुझ्यावर इतके पैसे मोजून आम्ही चूक केल्याचे सांगतो. नीलेश साळुंखेच्या देहबोलीबाबत प्रशिक्षक श्रीनिवास रेड्डी त्याला हिणवताना मरतुकडय़ासारखा उभा राहतोस, ही भाषा वापरतात. कोपरारक्षक संदीप धूल एका प्रसंगात तर स्पष्टपणे विचारतो की, संघ जिंकला की आम्हाला श्रेय नाही. मग हरल्यावर फक्त कोपरराक्षकच जबाबदार कसे ठरतात? माहितीपटातून मांडलेल्या या वास्तववादी प्रसंगांमधून हे मैदानापलीकडचे कंगोरे दाखवण्याची खरेच काही आवश्यकता होती का?, असा प्रश्न पडतो.

१९९० मध्ये कबड्डीत मिळवलेल्या पहिल्या आशियाई सुवर्णपदकापासून हरयाणामधील चित्र कसे पालटले, हे उत्तम दाखवले आहे. प्रशिक्षक रेड्डी, दीपक हुडा, नीलेश साळुंखे, नीती रावल, आदी खेळाडूंच्या आयुष्याला कबड्डीमुळे कशी कलाटणी मिळाली, त्यांना कसा संघर्ष केल्यानंतर हे चांगले दिवस अनुभवायला मिळाले आहेत, हे मात्र प्रेरणादायी पद्धतीने समोर येतात. त्यामुळे ही वेबमालिका ‘जयपूर पिंक पँथर्स.. सन्स ऑफ दी सॉइल’ या नावाला काही प्रमाणातच न्याय देते.

‘जयपूर पिंक पँथर्स.. सन्स ऑफ दी सॉइल’

दिग्दर्शक – ओमकार पोतदार

अ‍ॅप – अ‍ॅमेझॉन प्राइम