नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ सिनेमा खूपच हिट ठरला. या चित्रपटाची कथा दिग्दर्शक करण जोहरच्याही हृदयालाही भिडली. त्याचवेळी ‘सैराट’च्या रिमेकची घोषणा करणनं केली. हिंदीत ‘सैराट’ येणार याची उत्सुकता मराठी प्रेक्षकांना होतीच पण या चित्रपटातील रिंकू- परश्याची भूमिका कोण साकारणार याचंही कुतूहल अनेकांना होतं. अखेर जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर या दोघांचं नाव चित्रपटासाठी पक्क झालं. ‘धडक’चा ट्रेलर, गाणी प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून नकारात्मक प्रतिसाद जास्त आला. पण, बॉक्स ऑफिसवर मात्र या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Dhadak Movie Review : प्रेक्षकांच्या हृदयाची ‘धड़क’ वाढविण्यास असमर्थ

पहिल्याच दिवशी या चित्रपटानं आठ कोटींहून अधिकची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं ११.०४ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे ‘धडक’नं दोन दिवसांत एकूण १९.७५ कोटींचा गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला आहे. वीकेंडपर्यंत हा चित्रपट ३० कोटींचा आकाडा पार करेल असं मत अनेक चित्रपट व्यापार विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे. नवोदीत कलाकाराच्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळालेला सर्वात चांगला प्रतिसाद आहे अशा शब्दांत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी धडकचं कौतुक केलं आहे.

फक्त भारतातच नाही तर जगभरातही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं आंतरराष्ट्रीय पातळीवर साडेतीन कोटींहून अधिकची कमाई केली आहे.