News Flash

‘जाऊ द्या ना भाई’सद्य:स्थितीचे व्यंगचित्र

खक-दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र हे अलीकडच्या काळातलं आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धामधलं दबदबा असलेलं नाव. सतत काहीतरी नवं, वेगळं करण्याचा ध्यास घेणाऱ्या सुनील हरिश्चंद्र यांनी अल्पावधीतच व्यावसायिक

| May 17, 2015 12:27 pm

लेखक-दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र  हे अलीकडच्या काळातलं आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धामधलं दबदबा असलेलं नाव. सतत काहीतरी नवं, वेगळं करण्याचा ध्यास घेणाऱ्या सुनील हरिश्चंद्र यांनी rv09अल्पावधीतच व्यावसायिक रंगभूमीवर उडी घेत जाणकारांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘जाऊ द्या ना भाई’ हे त्यांचं नवं नाटक. ‘वस्त्रहरण’, ‘यदा कदाचित’ या अस्सल देशी फार्सच्या पठडीतलं. मात्र ‘जाऊ द्या ना भाई’वर नाटककार शफाअत खान यांच्या ‘शोभायात्रा’ या गाजलेल्या नाटकाचा गडद प्रभाव नक्कीच दिसून येतो. रचनेपासून विषयापर्यंत आणि मांडणीपासून हाताळणीपर्यंत सगळ्याच बाबतींत ही गोष्ट प्रकर्षांनं जाणवते. असं असलं तरीही नाटक प्रेक्षकाला खिळवून ठेवतं ते त्याच्या आशयानं आणि गतिमान हाताळणीनं. ‘नाटकातलं नाटक’ या हाताळायला काहीशा अवघड प्रकारतलं हे नाटक. सतत दोन पातळ्यांवर ते फिरत राहतं.
..कॉलेजातली मुलं स्पर्धेसाठी एकांकिका बसवताहेत. नेहमीप्रमाणे कलाकार निवडीचा घोळ शेवटपर्यंत मिटत नाहीए. साधारणत: प्रारंभी कुठलाही तरुण, होतकरू दिग्दर्शक हा कुरोसावा, पिरॅन्देलो, स्तानिस्लावस्कीसारखंच आपल्यालाही एक दिवस महान दिग्दर्शक बनायचंय, हे स्वप्न उराशी बाळगूनच rv14नाटय़क्षेत्रात येत असतो. या एकांकिकेचा दिग्दर्शक सतीश हाही याला अपवाद नाही. परिणामी महान दिग्दर्शक बनण्याची घाई झालेला आणि आपल्यालाच फक्त नाटक कळतं असं मानणारा सतीश तालमीतल्या गडबड-घोटाळ्यांनी आणि कलाकारांच्या बथ्थडपणामुळे सतत डोक्यात राख घालून आकांडतांडव करत असतो. परंतु  तालीमला आलेल्या मुलांचं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं. कुणी ज्यादा अॅक्टिंग करतं, तर कुणाला अॅक्टिंग कशाशी खातात हेच माहीत नसतं. तर कुणी एकांकिकेतल्या मुलीलाच गटवायला आलेला असतो. असं प्रत्येकाचं एकांकिका सोडून काही ना काही भलतंच चाललेलं असतं. त्यानं सतीश माथं आणखीनच ठणकतं. या प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स सोडवता सोडवता एकांकिका कधी बसणार, हा प्रश्नच असतो.
अशात शर्मिला नावाची मुलगी घाबरीघुबरी होऊन ‘मला वाचवा.. मला वाचवा’ अशी ओरडत तालमीच्या हॉलमध्ये घुसते. त्यामुळे आधीच तालमीची बोंब असताना ही आणखीन एक नवी ब्याद उपटली म्हणून सतीश प्रचंड वैतागतो. पण शर्मिलानं तिच्या भयग्रस्ततेचं कारण सांगताच सगळ्यांचीच पाचावर धारण बसते.
प्रा. वीरेंद्र प्रधान यांनी लेक्चर घेताना ‘नावात काय आहे?’ हे सुप्रसिद्ध वाक्य कुणाचं, असा प्रश्न विचारला असता वर्गातील गुंड प्रवृत्तीचा ज्युनियर पावटय़ा या मुलानं दिलेल्या आचरट उत्तरानं सबंध वर्ग फिदीफिदी हसतो. त्याच्या त्या आचरटपणाचा राग येऊन शर्मिला त्याच्याकडे चिडून रागानं बघते. तिच्या या हिमतीने संतापून ज्यु. पावटय़ा भर वर्गात तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतो.  या प्रकारामुळे संतापलेले प्रा. प्रधान ज्यु. पावटय़ाच्या कानाखाली वाजवतात. त्यामुळे वेडापिसा झालेल्या ज्यु. पावटय़ाने प्रा. प्रधान आणि शर्मिलाचा जीव घेण्याची प्रतिज्ञा केलेली असते आणि तो त्यांना शोधत असतो.
झाला प्रकार कळताच सर्वाचीच हबेलंडी उडते. प्रत्येकालाच आपला जीव प्यारा असल्याने शर्मिलाला वाचवायला कुणीही पुढे येत नाही. उलट जो-तो याच्याशी आपला काहीएक संबंध नाही हे दाखवण्यासाठी ज्यु. पावटय़ापासून लपू पाहतो. तशात तालमीतल्या एकांकिकेचे लेखक असलेले प्रा. वीरेंद्र प्रधानही जिवाच्या भीतीनं लपण्यासाठी तालीम हॉलचाच आश्रय घेतात. आता ही नस्ती भानगड कशी निस्तरावी, या विवंचनेत प्रत्येकजण असतानाच ज्यु. पावटय़ाचे नामचीन गुंड असलेले पिताश्री पावटय़ाभाई तिथं अवतरतात. आता आपली काही धडगत नाही हे सर्वानाच कळून चुकतं. परंतु या जीवघेण्या संकटातूनही ही मंडळी आपला जीव कसा वाचवतात, याची धम्माल गोष्ट म्हणजेच ‘जाऊ द्या ना भाई’!
लेखक-दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र यांनी या विषयाला समकालीन राजकीय-सामाजिक वास्तवाची फोडणी देत त्यासंबंधी वक्रोक्तीपूर्ण भाष्य करण्याचा यशस्वी प्रयत्न नाटकात केला आहे. यासाठी ‘नाटकातल्या नाटका’चा फॉर्म त्यांनी निवडला आहे. सुरुवातीला नाटक तालमींतल्या थिल्लर घडामोडींतच अडकून पडणार की काय असं वाटत असतानाच अचानक ते ट्रॅक बदलतं आणि आपण त्यात गुंगून जातो. एकांकिका बसणार की नाही, या विवंचनेत असलेल्या या मंडळींची एकांकिका आपसूकच आकार घेत जाते. आणि दस्तुरखुद्द तिचे लेखक प्रा. वीरेंद्र प्रधान हेही परिस्थितीवश त्यातलं एक पात्र बनतात. या नाटकाआतलं बनावट नाटक अधूनमधून उघड होणार आणि सगळेच गोत्यात येणार असं वाटत असतानाच काहीतरी भलतं घडतं आणि बिंग फुटायचं टळतं.. हीसुद्धा या नाटकातली खासी गंमत आहे. तळ्यात-मळ्यातल्यासारखं प्रत्यक्षातलं नाटक आणि खोटं नाटक यांची सरमिसळ होत ‘जाऊ द्या ना भाई’ उत्कर्षांप्रत पोहोचतं. ही सगळी गंमत सुनील हरिश्चंद्र यांनी अत्यंत बुद्धिमानतेनं हाताळली आहे. बहुतांश तरुण व अघड (रॉ) कलावंतांना घेऊन त्यांनी हे साहस केलेलं आहे. मात्र, हे करत असताना त्यांच्यावर कळत-नकळतपणे असलेला नाटककार शफाअत खान यांच्या ‘शोभायात्रा’ आणि ‘गांधी आडवा येतो’ या नाटकांचा प्रभाव सतत जाणवत राहतो. अगदी विषयापासून आशयापर्यंत आणि पात्रयोजनेपासून मांडणीपर्यंत तो सर्वच बाबतींत प्रकर्षांनं जाणवतो. ‘जाऊ द्या ना भाई’मध्ये समकालीन वास्तवावर भाष्य करण्यासाठी सुनील हरिश्चंद्र यांनी ऐतिहासिक व्यक्तींचा वापर करत त्यांच्याकरवी सद्य:स्थितीवर कोरडे ओढले आहेत. आज भ्रष्टाचारी, गुंडपुंड, गुन्हेगार मंडळींकडूनच लोकशाहीचं रक्षण, आदर्श मूल्यं, न्याय वगैरेंची अपेक्षा करण्याची पाळी आपल्यावर आलेली आहे. कारण लोकप्रतिनिधींच्या रूपात आज हीच मंडळी सत्ताधारी झालेली आहेत. देशाचं भवितव्य आता याच मंडळींच्या हाती आहे. ही भयावह वस्तुस्थिती या नाटकात मांडण्याचा प्रयत्न सुनील हरिश्चंद्र यांनी केलेला आहे. मात्र, हे करत असताना निखळ करमणुकीचाही त्यांना विसर पडलेला नाही. त्यामुळे प्रारंभीचे अनावश्यक ताणलेले प्रसंग आणि अखेरीस स्वर्गस्थ नेत्यांचा काहीसा लांबलेला उपदेश यांचा अपवाद वगळता नाटक प्रेक्षकाला खिळवून धरतं. अर्थात कलाकारांच्या कामांमध्ये मात्र अजूनही सफाई येण्याची आवश्यकता आहे. मात्र, सर्वानीच आपापल्या परीनं जीव ओतून काम केलेलं आहे. स्वत:ला महान दिग्दर्शक समजणाऱ्या सतीशच्या भूमिकेत गौरव मालंडकरने अर्कचित्रात्मक शैली स्वीकारली आहे. पुढे यमाच्या रूपात ते विनोदाची वेगळीच शैली वापरतात. संदीप रेडकर यांनी घाऊक प्रेमिक निलेश आणि सुभाषबाबूंचं सोंग ही दोन भिन्न बेअरिंग घेताना उडणारी त्रेधातिरपीट धमाल दाखविली आहे. प्रा. वीरेंद्र प्रधान आणि गांधीजींच्या भूमिकेतली धूसर सरमिसळ तुषार विचारे यांनी उत्तम व्यक्त केली आहे. ऊर्मिलाचा नाटकी फणकारा आणि कस्तुरबांचं ओजस्वी रूप यांतला तोल पूर्वा कौशिक यांनी सांभाळला आहे. श्रीकांत भगत यांचा धांदरट गोपी आणि ताठ कण्याचे स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांचा प्रसंगावधानी आब अचूक टिपलाय. सरळ-साध्या नंद्याच्या भूमिकेत रोहित माने यांनी आपल्या देहबोलीचा छान वापर केलाय. ज्युनियर पावटय़ा झालेले प्रथमेश शिवलकर अपेक्षित दहशत निर्माण करतात. तर त्याचे पिताश्री पावटय़ाभाई- सुनील जाधव यांनी आपल्या दहशतमिश्रित साधेपणानं संस्मरणीय  केले आहेत. ऐश्वर्या पाटीलची शर्मिला आणि झाशीची राणी ठीक.  
नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी कॉलेजचा तालीम हॉल यथार्थपणे साकारला आहे. श्याम चव्हाण यांची प्रकाशयोजना नाटय़ांतर्गत अपेक्षित थ्रिल निर्माण करते. संतोष बोटे यांचं संगीत मूड्सबरोबर नाटकाला आवश्यक करमणूकमूल्य प्रदान करते. अपर्णा गुराम यांची वेशभूषा आणि वैभव परशेटय़ेंची रंगभूषा नाटकाची मागणी पुरवणारी आहे. एकुणात, एक ‘चांगला जमलेला प्रयोग’ असंच ‘जाऊ द्या ना भाई’चं वर्णन करावं लागेल.

-रवींद्र पाथरे 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2015 12:27 pm

Web Title: jau dya na bhai
टॅग : Marathi Drama
Next Stories
1 बॉम्बे वेलवेट: प्रेक्षणीय, पण गुंतागुंतीचा
2 भरकटलेले युद्ध
3 कतरिनाची ‘कान’वारी
Just Now!
X