कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी मंगळवारी स्थलांतरित कामगारांना राज्य सोडून जाऊ नका असं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता कर्नाटक सरकारने या कामगारांना त्यांच्या राज्यात घेऊन जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी संताप व्यक्त केला आहे. बिल्डरांच्या इशाऱ्यावरुन हा निर्णय घेतल्याची टीका त्यांनी केली आहे.

“बिल्डर लॉबीने दिलेल्या इशाऱ्यामुळेच गरीब मजुरांसाठी सुरु करण्यात आलेल्या विशेष ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी या मजुरांना आता आपल्या घरी जाता येणार नाही. सत्ताधीश या गरीबांना त्यांच्या घरी जाण्यास रोखत आहेत. कारण त्यांना काही इमारती तयार करायच्या आहेत.” अशा आशयाचे ट्विट करुन जावेद अख्तर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

राज्य सरकारने दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आहे. ६ मेपासून कर्नाटकमधून इतर राज्यांमध्ये जाण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सर्व ट्रेन रद्द कराव्यात अशी मागणी या पत्रामध्ये सरकारने केल्याचे वृत्त ‘द क्विंट’ने दिले आहे. बिल्डरांबरोबरच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचेही ‘क्विंट’ने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या अधिकाऱ्यांबरोबर मंगळवारी संध्याकाळी बैठक घेतली होती. या बैठकीनंतर येडियुरप्पा यांनी इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकमध्ये करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याचे सांगितले होते. त्यामुळेच रेड झोन वगळता इतर सर्व ठिकाणी उद्योग-व्यवसाय, गृहनिर्माण आणि औद्योगिक कामकाज सुरु करण्याची गरज असल्याचे मतही येडियुरप्पा यांनी व्यक्त केलं होतं. इतर राज्यांमधील कामगार हे घाबरुन आपल्या राज्यात परत जात आहेत. अशा कामगारांना थांबवण्याची गरज असल्याचे मतही येडियुरप्पा यांनी व्यक्त केलं होतं.