बॉलिवूडचे सुप्रसिद्ध लेखक जावेद अख्तर हे वेगवेगळ्या विषयांवर आपलं मत नेहमीच स्पष्टपणे व्यक्त करत असतात. त्यामुळे ते अनेकदा ट्रोल सुद्धा झाले आहेत. त्यानंतर आता जावेद अख्तर यांनी नुकतंच शेअर केलेल्या एका ट्विटमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा उल्लेख करताना त्यांची तुलना बादशहा शहाजहानसोबत केलीय. त्यांच्या ट्विटमुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येतंय. यातच फिल्ममेकर विवेक अग्निहोत्री यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलीय.

जावेद अख्तर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक ट्विट शेअर करत शहाजहान भारतीय असल्याचं ते सांगत होते. इतकंच नव्हे तर शहाजहानमध्ये राजपूतांचं रक्त असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं, “ओबामाचे पिता हे केनियाचे होते…त्यांच्या काकी सुद्धा आजही केनियामध्येच राहतात…ओबामा यांचा जन्म अमेरिकेत झाला म्हणून त्यांना निवडणूकीत उभं राहण्याचा अधिकार मिळाला…शहाजहान हे भारतातल्या पाचव्या पिढीतील होते…त्यांची आजी आणि आई सुद्दा राजपूत घराण्यातल्या होत्या…पण ते आजही शहाजहानला विदेश म्हणतात.” जावेद अख्तर यांच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली.

यात फिल्ममेकर विवेक अग्निहोत्री यांनी सुद्धा जावेद अख्तर यांच्या ट्विटला रिप्लाय करत आपली प्रतिक्रिया देत त्यांचं हे वक्तव्य हास्यास्पद असल्याचं म्हटलंय. यात त्यांनी लिहिलं, “जावेद साहेब, हे चुकीचं आहे..शहाजहानसारखं ओबामा यांच्या पालकांनी किंवा आजोबांनी अमेरिकेवर कधी आक्रमण नव्हतं केलं…ओबामा यांनी अमेरिकेतील चर्च कधी मोडली नाहीत, किंवा तलवारीने अमेरिकन नागरिकांचं धर्मांतर केलं नाही. हा एक हास्यास्पद युक्तिवाद आहे.”

जावेद अख्तर हे सोशल मीडियावर ट्रोल होण्याची ही काही पहिली वेळी नाही. यापूर्वी अनेकदा जावेद अख्तर आपल्या ट्विटमुळे वादांमध्ये अकडले आहेत. अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे लोकांच्या निशाण्यावरही आले आहेत. त्यांच्या या ट्विटमुळे फॅन्स भलतेच नाराज झाले आहेत.