“या देशाची अवस्था मध्य पूर्वेतील धर्मांध आणि हुकूमशाही देशांसारखी करण्याचा प्रयत्न सुरु आहे, मात्र आम्ही त्यांना यशस्वी होणार नाही.”

प्रसिद्ध कवी-गीतकार जावेद अख्तर यांनी नरेंद्र मोदी प्रशासनावर सडकून टीका केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या सातव्या ‘पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हल’चे उद्घाटन जावेद अख्तर यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली.

“जगभरात सध्या मंदी सदृष्य वातावरण आहे. या आर्थिक गोंधळाचा लवकरच भारतावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत योग्य आर्थिक उपाय योजना करणे गरजेचे आहे. परंतु देशाचे पंतप्रधान इतर देशांचे दौरे करण्यात व्यस्त आहेत. भारतात सध्या धार्मिक उन्माद माजला आहे. त्यामुळे देशाचे राजकारण हुकूमशाही व धर्मांध प्रवृत्तीच्या दिशेने जात आहे. परंतु देशात हजारो वर्षे जुनी सभ्यता टिकून असल्याने लोकशाही जिवंत आहे. आम्ही त्यांना यशस्वी होऊ देणार नाही. देश म्हणजे ट्विटर नाही. देशाचे निर्णय ट्विटरवर करू नका” अशा परखड शब्दात जावेद अख्तर यांनी प्रशासनावर तुफान टोलेबाजी केली.

माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही

स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदुत्ववादी होते, परंतु त्याचबरोबर त्यांनी विज्ञानाची कास कधी सोडली नाही. मौलाना आझाद व महात्मा गांधी धार्मिक होते; पण ते धर्मनिरपेक्ष देखील होते. अशी उदाहरणे देत जावेद अख्तर यांनी धर्म आणि धर्मांधतेत असलेला फरक समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.