“चित्रपटसृष्टी घराणेशाहीच्या आधारे चालूच शकत नाही. या क्षेत्रात घराणेशाही असणे शक्यच नाही”, असं ठाम मत प्रसिद्ध लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी मांडलंय. बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलं. “नेपोटिझम (घराणेशाही) जगभरात सर्व ठिकाणी आहे. ती चांगली गोष्ट नाही पण सर्व ठिकाणी घराणेशाही आहे. मात्र फिल्म इंडस्ट्रीत घराणेशाही शक्य नाही”, असं ते म्हणाले.

‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. घराणेशाहीबाबत ते म्हणाले, “फिल्म इंडस्ट्रीमध्ये कलाकार हा प्रेक्षकांच्या मर्जीने मोठा होतो. कोणाचाही मुलगा असो किंवा मुलगी, त्याला फक्त प्रेक्षकच मोठे करू शकतात. आईबाबा होण्याच्या नात्याने मुलाला किंवा मुलीला इंडस्ट्रीत संधी देणं काहीच चुकीचं नाही. ते कर्तव्य म्हणून करतात. पण जर मुलामध्ये प्रतिभा नसेल तर तो इथे टिकणारच नाही. दुसऱ्या क्षेत्रात घराणेशाही होऊ शकते पण इंडस्ट्रीत होऊ शकत नाही. इथे ते शक्यच नाही.”

आणखी वाचा : एनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला अश्रू अनावर

या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी बॉलिवूडमधल्या ड्रग्जच्या मुद्द्यावर भाष्य केलं. “बॉलिवूडमधल्या कलाकारांवर ड्रग्ज सेवनाचा आरोप होत आहे. हा सर्व वेडेपणा आहे. आताचे कलाकार फिटनेसवर इतकं लक्ष देतात की त्यांच्याकडे पाहून तुम्हाला वाटतं का की ते ड्रग अॅडिक्ट आहेत?”, अशा प्रश्न त्यांनी विचारला.