भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट संगीतकार आर. डी. बर्मन यांनी संगीताला नवी परिभाषा दिली. काळाच्या पुढे विचार करणाऱ्या पंचमदांची ७५ वी जयंती अलिकडेच साजरी करण्यात आली. या निमित्ताने प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी ट्विटच्या माध्यमातून आर. डी. बर्मन यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. मात्र या ट्विटवर एका नेटकऱ्याने नाराजी व्यक्त केली होती. जेव्हा पंचमदांना बॉलिवूडने काम देणं बंद केलं होतं तेव्हा तुम्ही कुठे होता? असा प्रश्न या नेटकऱ्याने विचारला होता. या प्रश्नावर जावेद अख्तर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते जावेद अख्तर?

“पंचमदा एक लोकप्रिय संगीतकार होते. नव्या पिढितील रसिकही त्यांच्या गाण्यांचे कौतुक करतात. ते एक प्रतिभाषाली आणि काळाच्या पुढे लिहिणारे संगीतकार होते. मी स्वत:ला सौभाग्यशाली समजतो की मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.” अशा आशयाचे ट्विट जावेद अख्तर यांनी केले होते.

काय म्हणाला नाराज नेटकरी?

“श्रीमान जावेद अख्तर करिअरच्या शेवटच्या काळात पंचमदांना काम का मिळत नव्हते? या बॉलिवूडवाल्यांनी त्यांना इंडस्ट्रीमधून बाहेर का केले होते? त्यावेळी त्यांच्या प्रतिभेचा विचार का केला गेला नव्हता?” अशा अशयाचे प्रश्न या नेटकऱ्याने जावेद अख्तर यांना विचारले.

नाराज नेटकऱ्याच्या ट्विटवर काय म्हणाले जावेद अख्तर?

“१९४२ साली लव्ह स्टोरी या चित्रपटासाठी आम्ही शेवटचं एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाची गाणी सुपरहिट झाली होती. परंतु या अल्बमचं यश पाहण्यासाठी आर. डी. बर्मन आपल्यामध्ये राहिले नाहीत.” अशा आशयाचं ट्विट करुन जावेद अख्तर यांनी त्या नाराज नेटकऱ्याला प्रत्युत्तर दिलं. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.