देशात शहरांची रस्त्यांची नावं बदलण्याची मोठी मोहीम सुरू आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं काही शहरांची नाव बदलून टाकली. तर महाराष्ट्रातही औरंगाबादचं नामांतर करण्याची मागणी होत आहे. पण, भाजपाचं सरकार असलेल्या गुजरातमध्ये मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी थेट फळाचं बारसं केलं आहे. ड्रॅगन फ्रुट म्हणून प्रसिद्ध असलेल्या फळाचं रुपाणी यांनी नामाकरण केलं असून, गुजरातमध्ये ड्रॅगन फ्रूट कमलम (कमळ) या नावानं ओळखलं जाणार आहे. दरम्यान बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जावेद अख्तर यांनी एक ट्वीट केले आहे. ‘गुजरातचे माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितले की ड्रॅगन फ्रूट हे कमळासारखे दिसते. त्यामुळे त्याचे नाव कमलम असे असायल हवे. शानदार. पहिले शहरांची नावे आणि आता फळांची. काही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावंही बदलतील. खरच हे सर्व मजेदार आहे’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.

जावेद अख्तर यांच्या ट्वीटवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या त्यांचे हे ट्वीट चांगलेच चर्चेत आहे. देशात आणि जगभरात ड्रॅगन फ्रूट नावानं प्रसिद्ध असलेलं फळ गुजरातमध्ये कमलम म्हणून ओळखलं जाणार आहे. फळाला ड्रँगन शब्द वापरणं चांगलं नाही. ड्रॅगन हे फळ कमळासारखं दिसत. त्यामुळे या फळाला नावं संस्कृत शब्दानुसार कमलम हे देण्यात आलं आहे, असं सांगत मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ड्रॅगन फ्रूटच्या नव्या नावाची घोषणा केली.