उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. मध्यरात्री ३ वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबाने युपी पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा दावा केला आहे. या घटनेवर जावेद अख्तर यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

‘यूपी पोलिसांनी हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या मृतदेहावर रात्री २च्या सुमारास तिच्या कुटुंबीयांच्या परवानगी शिवाय आणि इतकच नव्हे तर त्यांच्या उपस्थिती शिवाय अत्यंसंस्कार केले. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोणत्या गोष्टीमुळे त्यांना इतके साहस मिळाले की त्यांनी असे पाऊल उचलले. त्यांना हे करण्याचा अधिकार कोणी दिला’ या आशयाचे ट्विट करत जावेद अख्तर यांनी संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा- Hathras Gangrape: युपी पोलिसांकडून जबरदस्ती करण्यात आले पीडितेवर अंत्यसंस्कार, कुटुंबीयांचा दावा

बलात्कार पीडित १९ वर्षीय दलित तरुणीचा दोन आठवड्यानंतर मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडित तरुणीच १४ सप्टेंबरपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली. चौघांनी तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

आणखी वाचा- Hathras Gangrape : ‘ओढणी गळ्यात टाकून तिला खेचत नेलं आणि…’; जाणून घ्या १४ सप्टेंबरला नक्की काय घडलं

पीडितेच्या भावाने इंडियन एक्स्प्रेशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “माझ्या बहिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले असं दिसतंय. पोलीस आम्हाला काहीच माहिती देत नाहीयेत. अखेरचं एकदा तिचं पार्थिव घरी आणलं जावं यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो, पण त्यांनी ऐकलं नाही”.