करोना विषाणूमुळे संपूर्ण जगात सध्या भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. २०० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. सर्वसामान्य लोकांपासून अगदी सुरक्षित क्षेत्रात राहणाऱ्या सेलिब्रिटींपर्यंत कोणालाही करोनाने सोडलं नाही. दरम्यान हॉलिवूड अभिनेता जे बेनेडिक्ट यांचा करोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

६८ वर्षीय बेनेडिक्ट हॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेता होते. बेनेडिक्ट यांच्या अधिकृत वेबसाईटने माहितीनुसार त्यांना २८ मार्च रोजी करोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्यांचे शरीर डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. अखेर सात दिवसांच्या संघर्षानंतर चार मार्चला त्यांची प्राणज्योत मावळली.

जे बेनेडिक्ट हॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीत ‘द रशियन हाऊस’, ‘सेव्हिंग ग्रेस’, ‘पेज लाईट’, ‘हॉस्टेल’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते. ‘एलियन’ आणि ‘बॅटमॅन: द डार्क नाईट राईज’ या दोन चित्रपटांनी त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यांनी काही कार्टून चित्रपटांना देखील आवाज दिला होता. जे बेनेडिक्ट यांच्या मृत्यूमुळे हॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियाव्दारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.