चतुरंग प्रतिष्ठान आयोजित २४ व्या रंगसंमेलनात जुन्या आणि नव्या अशा निवडक बारा नाटकांमधील ‘स्वगतां’चा ‘रंगवैभव’ हा खास कार्यक्रम होणार आहे. सध्या लोकप्रिय असलेल्या ‘का रे दुरावा’ या मालिकेतील ‘जय’ (सुयश टिळक) आणि ‘अविनाश सर’ (सुबोध भावे) हे अभिनेते अनुक्रमे ‘संभाजी’ आणि ‘आप्पा बेलवलकर’ साकारणार आहेत. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’, ‘तो मी नव्हेच’, ‘ती फुलराणी’, ‘एकच प्याला’, ‘रणांगण’ आणि अन्य नाटकांतील स्वगते या कार्यक्रमात रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय कलाकार सादर करणार आहेत. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आणि ‘नटसम्राट’ या दोन्ही नाटकांनी रंगभूमीवर इतिहास घडवला. त्या नाटकांतील ‘संभाजी’ आणि ‘आप्पा बेलवलकर’ या भूमिकेत या दोघा कलाकारांना पाहणे हा रसिकांसाठी आगळा योग असणार आहे.
कार्यक्रमाचे लेखन योगेश सोमण आणि दिग्दर्शन मंगेश कदम यांनी केले असून सुनील बर्वे, पुष्कर श्रोत्री, स्पृहा जोशी यांचे सूत्रसंचालन आहे. कार्यक्रमात शरद पोंक्षे (नथुराम), डॉ. गिरीश ओक (लखोबा लोखंडे), रमेश भाटकर (विश्वामित्र), जयंत सावरकर (तळीराम), अविनाश नारकर (भाऊसाहेब पेशवे), डॉ. अमोल कोल्हे (चिंतो बापुजी), डॉ. अजय वैद्य (जीवाजी कलमदाने), रिमा (प्रमिला), लीना भागवत (बेणारे बाई), स्पृहा जोशी (मंजू) हे कलाकार सहभागी होणार आहेत. २७ आणि २८ डिसेंबर रोजी स. वा. जोशी विद्यालयाच्या पटांगणावर (डोंबिवली) होणाऱ्या रंगसंमेलनात ‘जल्लोष’ वाद्यफ्युजन, ‘नृत्यस्वरूप गीतरामायण’, रसिक आणि कलाकार यांच्यात थेट संवाद घडवून आणणारे चहापान संमेलन असे विविध कार्यक्रम असणार आहेत.
रंगसंमेलनात रविवार, २८ डिसेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते साहित्यिक व नाटककार रत्नाकर मतकरी यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
‘जल्लोष’ वाद्यफ्युजन कार्यक्रमात रवींद्र चारी (सतार), सत्यजीत तळवलकर (तबला), जिनो बॅक्स (ड्रम), शेल्डन डिसिल्वा (बेस गिटार), संगीत हळदीपूर (की बोर्ड) हे युवा कलाकार सहभागी होणार आहेत. ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके यांनी अजरामर केलेल्या ‘गीतरामायण’मधील २५ निवडक गीतांवर ‘नृत्यस्वरूप गीतरामायण’ हा नृत्याविष्कार सादर होणार आहे.
सोनिया परचुरे यांनी त्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. संमेलनात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर व मतकरी यांचे सुपुत्र गणेश मतकरी हे रत्नाकर मतकरी यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.
रंगसंमेलनाच्या पूर्णोत्सव प्रवेशिका १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत बोडस मंगल कार्यालय, रामनगर, डोंबिवली (पूर्व) येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत तर १६ डिसेंबरपासून चतुरंग कार्यालय, रजत सोसायटी, अश्विनी रुग्णालयाच्या मागे, टिळकनगर, डोंबिवली (पूर्व) येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत मिळणार आहेत.