अभिनेत्री कंगना रणौतनं बॉलिवूडवर टीका करताना ड्रग्ज रॅकेटशी कनेक्शन जोडलं होतं. त्यानंतर खासदार रवि किशन यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. रवि किशन यांना उत्तर देताना खासदार जया बच्चन यांनी सुनावलं होतं. या वादात आता ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा यांनी उडी घेतली आहे. त्यांनी जया बच्चन यांच्यावर टीका केली आहे.

जया प्रदा यांनी आजतक वृत्तवाहिनी बोलताना रवि किशन यांची पाठराखण करतानाच जया बच्चन यांच्यावर टीका केली. “फिल्म इंडस्ट्रीला कोणीही बदनाम करू शकत नाही. कुणाची तितकी पात्रता नाहीये. राहिली गोष्ट रवि किशन यांनी मांडलेल्या मुद्याची, त्यांनी संसदेत जे विधान केलं आहे. तर मला वाटत त्यांच्या बाजूनं उभं राहिलं पाहिजे. कारण त्यांनी चुकीची काही म्हटलेलं नाही. त्यांनी हेच म्हटलंय की बॉलिवूडमध्ये काही लोक अमली पदार्थांच्या आहारी गेलेले आहेत. ड्रग्ज संदर्भात जे व्यवहार होताहेत ते रोखायला हवेत. देशातील तरुणांना ड्रग्जपासून वाचवायला हवं, असं ते म्हणाले आहेत. मला वाटत नाही की यात ते काही चुकीचं बोलले आहेत. संपूर्ण इंडस्ट्रीला दोषी ठरवण्याची कुणाची पात्रता नाही,” असं जया प्रदा म्हणाल्या.

“आम्ही लोकही छोट्याचे मोठे झालो आहोत. हे सगळं इंडस्ट्रीमुळे झालं आहे. वरिष्ठ कलाकारांविषयी, त्यांच्या कामाविषयी आम्हाला अभिमान वाटतो. रिया चक्रवर्तीच्या माहितीनंतर अनेक ड्रग्ज पेडलर्संना अटक करण्यात आलं. पण, जया बच्चन यांनी असा का विचार केला. त्या खूप रागात होत्या. त्या नाराजही होत्या. त्या म्हणाल्या की, हे त्या स्वीकारणार नाहीत. हा इंडस्ट्रीचा अपमान आहे. मला हे सांगायचं की त्या याला वैयक्तिक घेत आहेत. मला वाटत की हा राजकीय प्रभाव असावा. त्या राजकीय पक्षाशी जोडलेल्या आहेत. त्या पक्षाचा हा प्रभाव असावा. याला राजकीय अंगानं घ्यायला नको,” असं जया प्रदा म्हणाल्या.

“आज आम्ही काही मोजक्या लोकांविषयी बोलत आहोत. चर्चा करत आहोत. काही तरुणांमुळे आम्ही चिंतीत आहोत. या ड्रग्ज माफियांना कसं रोखता येईल. मी जयाजींचा सन्मान करते. पण, त्यांनी ज्या प्रकारे भूमिका मांडली आहे. त्यानंतर मी रवि किशन यांचं समर्थन करेल. जयाजींनी जे म्हटलंय की ‘जिस थाली में खाते हैं उसमें छेद करते है’, तर हे त्या कुणाला म्हणत आहेत. ‘थाली में कौन छेद कर रहा है’ हे त्यांना चांगलं माहिती आहे,” असं जया प्रदा म्हणाल्या.