बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा या लवकरच इंडियन आयडॉल या शोच्या मंचावर दिसणार आहेत. त्यांच्या गाण्यांवर आधारित असलेल्या विशेष भागात त्या प्रमुख पाहुणी म्हणून दिसणार आहेत. या भागाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांनी आपल्या श्रीदेवीबरोबरच्या नात्याबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.
आपल्यात आणि श्रीदेवीमध्ये कधीच भावनिक नाते नव्हते आणि सेटवर आम्ही कधी एकमेकींशी बोललो नाही हे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, श्रीदेवी ही बॉलीवूडमधली तिची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी होती. इंडियन आयडॉलच्या सेट्सवर सर्व अभिनेत्यांबरोबर आपले नाते कसे होते हे जया प्रदा यांच्याकडून ऐकायला मिळेल.

श्रीदेवी आणि तिच्याबरोबरचे आपले नाते याविषयी बोलताना जया प्रदा म्हणाल्या, “मी खूप नशीबवान आहे असे मी मानते. आमच्या दोघींमध्ये वैयक्तिक वितुष्ट कधीच नव्हते पण आमच्या तारा कधीच जुळल्या नाहीत. आम्ही कधीही एकमेकींशी नजर मिळवली नाही, कारण आमच्या दोघींमध्ये स्पर्धा होती, मग ती पोशाखाची असो किंवा डान्सची! प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही भेटायचो, तेव्हा आमचा एकमेकींशी परिचय करून देण्यात यायचा. आम्ही फक्त एकमेकींना ‘नमस्ते’ म्हणून निघून जायचो”.

जया यांनी एका चित्रपटाच्या चित्रीकरणावेळचा एक किस्साही यावेळी सांगितला. त्या म्हणाल्या, “मला अजून आठवते आहे की, मकसद चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेस जितूजी आणि राजेश खन्ना जी यांनी आम्हां दोघींना एका मेकअप रूममध्ये एक तास कोंडून ठेवले होते, पण आम्ही दोघी एकमेकींशी एक शब्दही बोललो नाही आणि त्यानंतर सगळ्यांनी आमच्यासमोर हात टेकले. आज ती आपल्यात नाहीये, तर मला तिची खूप आठवण येत आहे. मला एकाकी वाटते आहे, कारण या बॉलीवूड उद्योगातली ती माझी मोठी प्रतिस्पर्धी होती. ती जर मला कुठूनही ऐकू शकत असेल, तर या मंचावरून मी हेच म्हणेन की, आम्ही एकमेकींशी बोलू शकलो असतो तर बरे झाले असते.”

जया आणि श्रीदेवी यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. ‘मकसद’, ‘तोहफा’, ‘औलाद’, ‘आज का अर्जुन’, ‘मै तेरा दुश्मन’, ‘मवाली’, ‘फरिश्ते’, ‘नया कदम’ हे त्यांचे काही चित्रपट. फेब्रुवारी २०१८ मध्ये दुबईमध्ये श्रीदेवी यांचं निधन झालं.