तामिळनाडूच्या दिवंगत नेत्या जे. जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जयललिता यांची भाची जे. दीपा यांनी बायोपिकविरोधात मद्रास हायकोर्टात धाव घेतली आहे. या बायोपिकवर आक्षेप नोंदवत त्यांनी स्थगिती देण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची घोषणा झाली होती. यामध्ये अभिनेत्री कंगना रणौत जयललिता यांची भूमिका साकारणार आहे.

”जयललिता या दिग्गज नेत्या होत्या आणि त्यांच्या खासगी आयुष्याविषयी चित्रपट केल्यास त्यांच्याशी निगडीत व्यक्तीसुद्धा त्यात येतात. त्यामुळे चित्रपटात माझा उल्लेख असल्यास त्याविषयी मला काहीच सांगण्यात आले नाही. माझ्या खासगी आयुष्याविषयी चित्रपटाच्या कथेत, संवादात उल्लेख असल्यास मला ते जाणून घेण्याचा अधिकार आहे,” असं दीपा म्हणाल्या. या बायोपिकसोबतच दीपा यांनी जयललिता यांच्या जीवनावर आधारित एका वेब सीरिजवरही आक्षेप नोंदवला आहे.

जयललिता यांच्या बायोपिकमध्ये अभिनेत्रीपासून ते तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होण्यापर्यंतची कथा दाखवण्यात येणार आहे. त्यांच्या भूमिकेसाठी कंगना प्रोस्थेटिक मेकअपचाही वापर करणार आहे. येत्या काही दिवसांत चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असून त्यापूर्वीच हा चित्रपट वादात अडकला आहे.