तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्युनंतर विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली देण्यात आली होती. अनेक बॉलिवूड कलाकारांनी आणि नेत्यांनी आपले दुःख व्यक्त करत ‘अम्मा’ यांना श्रद्धांजली वाहिली होती. एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले. जयललिता या त्यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये जितक्या प्रसिद्ध होत्या तितक्याच त्या त्यांच्या चित्रपट कारकीर्दीमध्येही प्रसिद्ध होत्या.

जयललिता यांच्या जाण्यामुळे राजकारणामध्ये एक प्रकारची पोकळीच निर्माण झाली आहे यात शंकाच नाही. पण आजही अनेकजण त्यांच्या आठवणी जागवत आहेत असे म्हणणेही वावगे ठरणार नाही. सोशल मीडियावर सध्या जयललिता यांच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ चर्चेत आहे. मुख्य म्हणजे या व्हिडिओमुळे अभिनेत्री ऐश्वर्या रायही चर्चेत आली आहे. सिमी गरेवाल यांनी घेतलेल्या मुलाखतीचा काही भाग जयललिता यांच्या निधनानंतर चर्चेत आला होता. त्यातीलच एक भाग सध्या सोशल मीडियावर गाजतोय. यामध्ये जयललिता त्यांच्या जीवनपटाविषयीसुद्धा बोलत आहेत. सिमी गरेवाल यांनी ज्यावेळी जयललितांना प्रश्न केला होता की, त्यांच्यावर जर कोणता चित्रपट बनला तर त्यांची भूमिका कोण साकारेल? यावर उत्तर देताना जयललिता यांनी अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या नावाला प्राधान्य दिले होते.

इथे योगायोगाची गोष्ट अशी की, ऐश्वर्याच्या ‘इरुवर’ या पहिल्या चित्रपटातील तिची भूमिकासुद्धा जयललितांपासून प्रेरित होती या चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले होते. जयललिता यांनी व्यक्त केलेली इच्छा आणि एकंदर चरित्रपटांचे बॉलिवूडमध्ये वाहणारे वारे पाहता ‘अम्मा’च्या जीवनावर आधारित चित्रपट बनणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, ‘मन- मौजी’ या १९६२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाद्वारे जयललिला यांचा चेहरा पहिल्यांदा बॉलीवूड चित्रपटामध्ये झळकला. किशोर कुमार आणि साधना यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात त्यांनी तीन मिनिटांची छोटीशी भूमिका साकारली होती. यात त्यांनी कृष्णाच्या वेशात एक नृत्यही केले होते. त्यानंतर त्यांनी १९६८ साली ‘इज्जत’ चित्रपटात धर्मेंद्र यांच्यासोबत काम केले. या चित्रपटात धर्मेंद्र आणि तनुजा यांच्या मुख्य भूमिका होत्या. ‘आ जा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो वीराने में भी आ जाएगी बहार’ हे ‘चोरी-चोरी’ चित्रपटातील त्यांचे आवडते गाणे होते.